गुरुवारी रात्री पाकिस्तान सैन्याने भारताच्या सीमारेषेवर 15 ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात ड्रोन्स, रॉकेट लाँचर्स आणि क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. मात्र भारताने एस-400 एअर डिफेन्स सिस्टम, एल-70 गन, Zu-23 मिमी अँटी एअरक्राफ्ट गन आणि शिल्का प्रणालीच्या मदतीने पाकिस्तानचा हा हल्ला निष्फळ ठरवला. या कारवाईदरम्यान, भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर युद्धनौकांनी कराची बंदरावर जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याचवेळी, भारतीय वायूदलाने पाकिस्तानातील प्रमुख शहरांवर रात्रभर ड्रोन हल्ले करत शत्रूला जबर धक्का दिला. यामुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. त्यातच मुंबईतूनही एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. साकीनाका परिसरात एक संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांनी केला आहे. सहार विमानतळाजवळून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला यासंदर्भात माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हजरत तय्यद जलाल मस्जिदच्या वरती हा ड्रोन दिसला होता. काही वेळातच तो ड्रोन साकिनाकाच्या झोपडपट्टी भागाच्या दिशेने गेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे साकिनाका पोलीस ठाण्याने तात्काळ कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास साकिनाका पोलीस आणि सीआयएसएफ पथकाने जरीमरीतील हरी मस्जिद परिसरात तपासणी केली. मात्र, या शोध मोहिमेत कोणताही ड्रोन आढळून आलेला नाही. तरीही नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अजितदादांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारली
 तर मुंबईच्या साकीनाका परिसरात ड्रोन दिसल्याचा दावा स्थानिकांनी केल्यानंतर एअर सिस्टीम अलर्ट मोडवर आली आहे. प्रत्येक उड्डाणाची चेकिंग केली जात आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार हे सध्या साताऱ्यात असून ते बायरोड मुंबईला येत असल्याचे वृत्त आहे.


