मुंबई विरुद्ध सिक्कीम सामन्यादरम्यान हा प्रसंग तेव्हा घडला, जेव्हा रोहित शर्मा बाउंड्री लाईनजवळ फिल्डिंग करत होता. काही चाहते त्याच्या मागून हसत-खेळत, “रोहित भाऊ, वडापाव खाणार का?” अशी हाक मारतात. यावर रोहितने अत्यंत मजेशीर अंदाजात हात वर करून, “नको रे बाबा” अशी प्रतिक्रिया दिली. रोहितच्या या क्षणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
जयपूरमध्ये झालेल्या या सामन्यात सिक्कीमने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 236 धावा केल्या. विकेटकीपर-फलंदाज आशीष थापाने 84 चेंडूमध्ये 79 धावांची झुंजार खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकडून मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने एकहाती सामना संपवला. रोहितने अवघ्या 94 चेंडूमध्ये नाबाद 155 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 18 चौकार आणि 9 षटकार ठोकले. फक्त 62 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत रोहितने आपला क्लास पुन्हा एकदा सिद्ध केला. परिणामी, मुंबईने जवळपास 20 षटके शिल्लक असतानाच हा सामना 8 विकेट्सने जिंकला.
https://x.com/Honest_Cric_fan/status/2003789339638280287?s=20
हा सामना रोहित शर्माचा तब्बल सात वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीतील पहिलाच सामना होता. रोहितची ही खेळी आणखी एका खास कारणामुळे ऐतिहासिक ठरली. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 150 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळीच्या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी केली. आता दोघांच्या नावावर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 150+ धावांच्या प्रत्येकी 9 खेळी नोंदल्या आहेत.


