Wednesday, November 5, 2025

रणधुमाळी पेटणार ? जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका नगरपालिका साठी मतदान यंत्राची माहिती मागवली

अहिल्यानगर-जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक पूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ईव्हीएम मशीनची माहिती मागविली आहे. जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या मतदार यंत्राची माहिती आयोगाला कळवल्यानंतर निवडणुकीसाठी आवश्यक पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.राज्य निवडणूक आयोगामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. राज्यामध्ये २६ महानगरपालिका, २३० नगर परिषदा, १०८ नगर पंचायती, ३४ जिल्हा परिषद, ३५१ पंचायत समित्या आणि २७,७८१ ग्रामपंचायती आहेत. दर पाच वर्षांनी निवडणुका घेऊन सुमारे २.५ लाख लोकप्रतिनिधी निवडले जातात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या निवडणुका रखडल्या आहेत. कालावधी संपलेल्या या संस्थांवर प्रशासक राज आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतींच्या निवडणुका नियमित कालावधी पूर्ण झाल्यावर होत आहेत. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकाही रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत रखडलेल्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक पूर्व कामाला सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या ईव्हीएम मशीनची माहिती आयोगाने मागविली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी अहिल्यानगर आणि शिर्डी असे दोन मतदारसंघ आहेत. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी या निवडणुकीला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यामुळे या मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम मशीन संरक्षित करून ठेवली आहेत. विधानसभा निवडणुकीतील काही मतदारसंघातील निवडणुकीला खंडपीठात आव्हान दिले आहे. ज्या मतदारसंघातील उमेदवारांनी खंडपीठात धाव घेतली आहे, तेथील ईव्हीएम मशीन संरक्षित करण्यात आल्या आहेत. पारनेर मतदारसंघातील निवडीला आव्हान दिले आहे.

दरम्यान, आता पावसाळा सुरू झाला असून या काळात निवडणुका घेणे शक्य नाही. तसेच नगर जिल्हा हा परतीच्या पावसाचा जिल्हा असून जिल्ह्यात दिवाळीनंतर पाऊस थांबतो. शिवाय गणेशोत्सव व नवरात्री या उत्सवांच्या काळात निवडणुका घेता येत नसल्याने जिल्ह्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles