सिंधी समाजाचा अपमान सहन होणार नाही
खासदार निलेश लंके यांची पोलिसांकडे धाव
छत्तीसगडमधील व्यक्तीच्या वक्तव्यावर संताप
“समाजात फूट पाडणाऱ्यांवर कठोर कारवाईच हवी!”
अहिल्यानगर : प्रतिनिधी
“सिंधी समाजाच्या धार्मिक भावनांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही!” असा इशारा अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांनी दिला.
छत्तीसगड राज्यातील एका व्यक्तीने सिंधी समाजावर धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने संतप्त झालेल्या समाजाने अहिल्यानगरात आंदोलनाचा केले. त्या पार्श्वभूमीवर खासदार लंके यांनी पोलीस निरीक्षक कार्यालयात धाव घेत निवेदन सादर केले आणि त्या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली.
“बाहेरील काही व्यक्ती समाजात मतभेद आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाने अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घातला नाही, तर शांततेवर परिणाम होईल. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करून समाजातील ऐक्य, शांतता आणि बंधुता टिकवणे आवश्यक आहे,” असे ठाम मत खासदार लंके यांनी व्यक्त केले.
सिंधी समाज हा शांततेचा संदेश देणारा, प्रगतीशील आणि सामाजिक योगदान देणारा समाज आहे. मात्र छत्तीसगडमधील व्यक्तीकडून आलेल्या वक्तव्यामुळे समाजात तीव्र रोष व अस्वस्थता पसरली आहे.
लंके म्हणाले, “सिंधी समाजाच्या भावनांचा अपमान हा फक्त एका समाजाचा नाही, तर देशातील एकतेवर आघात आहे. अशा गोष्टींना आम्ही झुकू देणार नाही.”
लंके यांनी स्पष्ट केले की, “भारत हा विविध धर्म, जाती आणि संस्कृतींचा संगम आहे. प्रत्येक समाजाचा सन्मान राखणं हीच खरी देशसेवा आहे. समाजात फूट पाडणाऱ्यांवर प्रशासनाने उदाहरणार्थ कारवाई करावी, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.”
या प्रसंगी सिंधी समाजाचे अध्यक्ष महेश मध्यान, नगरसेवक दीप चौहान, नगरसेवक योगीराज गाडे, मुदत सर शेख, सतीश आहुजा, भारत आहुजा, अनमोल रमनानी, अनिल चोपडा, राम आहुजा, कृष्णा आहुजा, प्रथमेश भाईंदरकर, हेमंत सावरे, राज गोरे, संदीप ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.


