नगरमध्ये भरपाई नाकारणाऱ्या विमा कंपनीस चपराक ;तक्रारदारास व्याजासह नुकसानभरपाई अदा करण्याचे ग्राहक तक्रार निवारणचे आदेश

अपघातग्रस्त वाहनास नुकसान भरपाई नाकारणाऱ्या विमा कंपनीस चपराक

तक्रारदारास व्याजासह नुकसानभरपाई अदा करण्याचे ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आदेश

नगर – अपघातग्रस्त चार चाकी वाहनास नियमानुसार नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपनीला अहिल्यानगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चपराक लगावली आहे. वाहन
धारक तक्रारदारास विमा दावा नाकारण्याच्या दिनांकापासून प्रत्यक्ष विमा रक्कम अदा करणे पर्यंत मूळ नुकसान भरपाई रक्कम 1 लाख 43 हजार 261 रूपये व त्यावर वार्षिक 9 टक्के व्याजदराने रक्कम अदा करावी तसेच तक्रारदारास मानसिक क्लेश व त्रासापोटी 25 हजार रुपये आणि तक्रार खर्चापोटी 10 हजार रुपये अदा करण्यात यावेत असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सादीक अली बशीर सय्यद, सदस्या चारू विनोद डोंगरे, सदस्या संध्या श्रीपती कसबे यांनी 25 मार्च 2026 च्या निकालपत्रात दिले आहेत. या प्रकरणात तक्रारदाराच्या वतीने ॲड. सचिन चांगदेव इथापे यांनी युक्तिवाद केला.

विस्तर माहिती अशी की, तक्रारदार सचिन चंद्रभान सातपुते (वय 33, धंदा- शेती व व्यापार, रा. अवचित वाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी वैयक्तिक, कौटुंबिक, शेतीसंबंधी कामासाठी बोलेरो चार चाकी वाहन मूळ मालक अशोक वसंत मांडेकर यांच्याकडून खरेदी केले होते. सातपुते यांनी वाहन नोंदणी व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमा पॉलिसीही निर्धारित शुल्क अदा करून हस्तांतरित करून घेतली. त्यानुसार तक्रारदाराच्या वाहनास 25 फेब्रुवारी 2020 अखेर विमा संरक्षण प्राप्त होते. यादरम्यान 17 फेब्रुवारी 2020 रोजी तक्रारदार नातेवाईकांसह नाशिक येथून परतत असताना मध्यरात्री 1 च्या सुमारास सिन्नर बायपास नजीक समोरून येणाऱ्या वाहनाची धडक होऊन अपघात झाला. यात तक्रारदाराच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. समोरच्या गाडीचे चालक प्रवीण जाधव यांनी तक्रारदारास मारहाण करून स्वतःच्या गाडीच्या नुकसान भरपाईपोटी तक्रारदाराकडूध 1 लाख 20 हजार रुपये घेतले. यांनतर तक्रारदाराने स्वतःचे वाहन दुरुस्तीसाठी संगमनेर येथील एस.एम. ऑटो वर्ल्ड येथे 22 फेब्रुवारी 2020 रोजी दुरुस्तीसाठी दाखल केले. 24 फेब्रुवारी 2020 रोजी तक्रारदाराने विमा कंपनीला रितसर क्लेम फॉर्म भरून दिला. विमा कंपनीच्या अधिकृत सर्व्हेअरने 5 मार्च 2020 रोजी वाहनाची प्रत्यक्ष पाहणी करून 1 लाख 72 हजार 445 रूपयाचे नुकसानीचे प्राथमिक अंदाजपत्रक नोंदवले. दरम्यान मार्च 2020 मध्ये कोविड महामारी मुळे सर्वत्र लॉकडाऊन लागले.‌लॉकडाऊन‌ शिथिल झाल्यानंतर तक्रारदाराने शोरूममध्ये चौकशी केली असता वाहन दुरुस्त झाले असून दुरूस्ती खर्च 1 लाख 43 हजार 261 रूपये विमा कंपनीने दिला नसल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराने चौकशी केली असता विमा कंपनीने 18 मार्च 2020 रोजी विमा दावा नाकारल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराने नियम भंग करून संबंधित वाहन व्यावसायिक कारणासाठी केल्याचा दावा विमा कंपनीने केला. यानंतर तक्रारदाराने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे तक्रार दाखल केली. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. विमा कंपनीने वाहन दुरुस्तीचे मूळ बिल सादर न केल्यामुळे अंतिम सर्व्हे पूर्ण होऊ शकला नाही व त्यामुळे विमा दावा नाकारला असे कारण दिले. तसेच वाहनाचा व्यावसायिक वापर झाला असल्याच्या युक्तिवाद केला. परंतु तक्रारदाराच्या वतीने हा दावा खोडून काढण्यात आला. विमा कंपनीलाही वाहनाचा व्यावसायिक वापर झाल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करता आले नाही. मूळ बिल न मिळाल्याने विमा दावा नाकारला हा विमा कंपनीचा मुद्दा वैध ठरणारा नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले. तक्रारदाराने अपघाताची एफ आय आर नोंदवली नाही हा विमा कंपनीचा बचावही अमान्य करण्यात आला. प्रत्येक अपघातात एफ आय आर नोदवणे अनिवार्य नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादांनतर ग्राहक आयोगाने निकालात नमूद केले की, तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. विमा कंपनीने तक्रारदारास संबंधित अपघाताबाबत वाहनाच्या नुकसानी पोटी 1 लाख 43 हजार 261 रूपये अदा करावेत, नुकसान रकमेवर दावा नाकारण्याच्या दिनांकापासून प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंत वार्षिक 9 टक्के व्याजदराने रक्कम अदा करावी, तक्रारदारास मानसिक त्रासापोटी 25 हजार रुपये व तक्रार खर्चापोटी 10 हजार रुपये अदा करावेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles