अहिल्यानगर जिल्ह्यातील कन्या आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते या त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आणि ‘लेडी सिंघम’ या नावाने ओळखल्या जातात. आता त्यांच्याकडे फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्येचा तपास देण्यात आला आहे. तेजस्वी सातपुते या मूळच्या पाथर्डी तालुक्यातील आहेत. त्यांचा जन्म शेवगावात झालेला आहे. त्यांनी स्थानिक ज्ञानदीप विद्या मंदिरातून प्राथमिक शिक्षण, बाळासाहेब भारदे हायस्कूलमधून मराठी माध्यमातून माध्यमिक शिक्षण घेतलेले आहे.
त्यांनी जळगाव, जालना, पुणे शहर आणि सोलापूर यासह अनेक ठिकाणी काम केले आहे, जिथे त्यांनी गुन्हेगारी विरोधी मोहीम आणि सार्वजनिक सुरक्षेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
साताऱ्यातील फलटण येथील रुग्णालयात नोकरीवर असणाऱ्या डॉक्टर महिलेच्या कथित आत्महत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली. या प्रकरणामुळे सरकारवर सडकून टीका केली जात आहे. या डॉक्टर महिलेने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा कळबळजनक दावा मृत डॉक्टर महिलेचे कुटुंबीय तसेच विरोधक करत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर काही पुरावे सादर करत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. असे असतानाच आता या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी मोठा निर्ण महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने हा तपास एका तडफदार महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर महिलेच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या एसआयटीचे नेतृत्त्व महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते या करतील. आता तेजस्वी सातपुते यांना तत्काळ तपास सुरू करावा, असा आदेश देण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता लवकर डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या खोलात जाऊन सत्य काय ते बाहेर आणले जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
तेजस्वी सातपुते यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास तत्काळ पूर्ण करावा. तसेच हा तपास करून अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे या एसआयटीला सांगण्यात आले आहे. डॉक्टर महिलेचे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणातील सत्य समोर यावे यासाठी एसआयटी स्थापन केली जावी अशी मागणी केली जात होती. त्यानंतर विरोधकांचा वाढता दबाव लक्षात घेता सरकारने हे प्रकरण एसआयटीकडे सोपवले आहे.


