जामखेड-रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि.8) जामखेड तालुक्यातील नायगाव येथे रूपाली नाना उगले (वय 25) यांनी मुलगा समर्थ उगले (वय 5) व मुलगी चिऊ उगले (वय 3) या दोन मुलांसह घराजवळील विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसर तसेच जामखेड तालुक्यात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मुलीचे वडील शिवाजी श्रीरंग सकुंडे (रा. पाटसांगवी, ता. भुम) यांच्या फिर्यादीवरून पती नाना उगले, सासरा प्रकाश उगले, मनिषा टाळके, शिवाजी टाळके यांच्या विरोधात खर्डा पोलीस ठाण्यात (गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, नायगाव येथे पती नाना उगले, पत्नी रूपाली, मुलगा समर्थ आणि मुलगी चिऊ असे चार जण घरात राहत होते. सायंकाळी मुलगा शाळेतून घरी आल्यावर रूपाली गणवेशातच मुलाला व लहान मुलीस विहिरीकडे घेऊन गेली व मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पती व सासरे शेतातून घरी आले असता त्यांना रुपाली व दोन्ही मुले घरी दिसून आले नाहीत. यावेळी त्यांनी आजुबाजुला शोध घेतला. दरम्यान, त्यांना शेजारील विहिरीच्यावर चप्पल दिसून आल्या, त्यानंतर आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत बोरीच्या काटाड्या टाकून रात्री उशिरा तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे ( सहायक पोलीस निरीक्षक उज्वल राजपूत पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी ग्रामस्थ आणि माहेरकडील नातेवाईकांची गर्दी जमली होती. आत्महत्येचे नेमकं कारण समजू शकले नाही. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत.