अहिल्यानगर -लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या संशयित आरोपीने पीडित युवतीला पुन्हा एकदा भररस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याची घटना अहिल्यानगर शहरात घडली आहे. याप्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश मनोज सावंत (रा. शिवाजीनगर, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 23 वर्षीय युवती सोमवारी (13 ऑक्टोबर) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास केडगावच्या एका कॉलनीतून जात होती.यावेळी अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी उमेश सावंत दुचाकीवरून तिथे आला. त्याने युवतीचा रस्ता अडवून, अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात दाखल केलेला गुन्हा त्वरित मागे घे, नाहीतर मी तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. तुला मारून टाकीन, तुझ्या मामाला डंपरखाली चिरडून ठार मारीन व तुझे लग्नही कुठे होऊ देणार नाही, असे म्हणून त्याने युवतीच्या अंगावरील ओढणी खेचून फेकून दिली. त्यानंतर त्याने पीडितेशी झटापट करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
पीडित युवतीने आरडाओरड करताच संशयित आरोपीने तेथून पळ काढला.दरम्यान, उमेश सावंत याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर युवतीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यात सावंत सध्या जामिनावर बाहेर आहे. आता पुन्हा त्याने पीडितेला त्रास दिल्याने कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.


