भररस्त्यात लेबर कॉन्ट्रॅक्टरला मारहाण; सोन्याची चैन गहाळ
अहिल्यानगर: शहरातील न्यू आर्ट्स कॉलेज परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि टनक वस्तूने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या राड्यामध्ये फिर्यादीची सोन्याची चैन गहाळ झाली असून, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी धान्य विठ्ठल काकडे (वय २०, रा. मिस्तबाग) हे २२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास चोभे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात होते. यावेळी आरोपी पंकज पराळे हा मोटारसायकलवरून, तर ऋषिकेश पराळे हा काळ्या रंगाच्या ‘थार रॉक्स’ (क्रमांक एम.एच. १६ डी.डब्ल्यू. १०००) कारमधून आपल्या सहकाऱ्यांसह तेथे आले. आरोपींनी फिर्यादीला गाठून अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी एका आरोपीने काकडे यांची गळ्यातील सोन्याची चैन आणि कॉलर धरून त्यांना खाली ओढले, ज्यामध्ये त्यांची चैन गहाळ झाली. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कोणत्या तरी टनक वस्तूने डोक्यावर व कानामागे प्रहार करून जखमी केले. “तुला बदला घ्यायचा असेल तर कायनेटिक चौकात ये, तिथे बघतोच,” अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी पंकज पराळे, ऋषिकेश पराळे व इतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस नाईक अरुण गांगुडे पुढील तपास करत आहेत.
भरदिवसा घरफोडी; ७३ हजारांचा ऐवज लंपास
अहिल्यानगर : शहरातील गजबजलेल्या नवीपेठ परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत रोख रकमेसह चांदीच्या वस्तू आणि पितळी भांडी असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी आनंद रतीलाल मुथा (वय ५२) यांचे नवीपेठ येथील टायटन शोरूमसमोर जुने घर आहे. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० ते २० फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजेच्या दरम्यान फिर्यादी घराबाहेर असताना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर तोडून चोरट्याने ८ हजार रुपये रोख, ५५ हजार रुपये किमतीची चांदीची समई, नाणी व इतर वस्तू तसेच १० हजार रुपये किमतीची पितळी भांडी लंपास केली.
मुथा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक अडसरे हे करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


