लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून तब्बल २६ लाख महिलांना अपात्र केले असल्याचे माहिती स्वतः आदिती तटकरेंनी दिली आहे. आदिती तटकरे यांनी सांगितले होते की, २६ लाख ३४ हजार महिला विविध कारणांनी अपात्र ठरल्या आहेत. याचसोबत १४२९८ पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, आता या अपात्र महिलांवर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेत जवळपास २६ लाख महिलांना निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. दरम्यान, या महिलांनी महिन्याकाठी १५०० रुपयांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करणार का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.
या योजनेत १४२९८ पुरुषांनीही १५०० रुपयांचा लाभ घेतला आहे. या योजनेत त्यांनी जवळपास १० महिने लाभ घेतला आहे. या पुरुषांनी जवळपास २७ कोटी रुपयांची लूट केल्याचा अंदाज आहे. या पुरुषांवर कारवाई करु, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.गरीब महिलांना आर्थिक मदत मिळावी, म्हणून ही योजना सुरु केली. ही योजना पुरुषांसाठी नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही पैसे वसूल करु. जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, असं अजित पवारांनी सांगितले आहे. दरम्यान, जसं ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, ज्या अपात्र महिलांनी लाभ घेतला त्यांच्यावर कारवाई होणार का याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.


