लाडकी बहीण योजनेत शासकीय महिला कर्मचारी, पुरुष लाभार्थी तसेच अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांनी तसेच एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची बाब समोर आली. यामुळे या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या अपात्र महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २ कोटी ५२ लाख लाभार्थींपैकी सुमारे २७ ते २८ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. गरजू महिलांच्या खात्यातच पैसे जमा व्हावेत यासाठी सरकारने आता लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई केवायसी केल्यानंतरच या महिलांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. लोकप्रिय ठरलेल्या या योजनेने महायुतीचे सरकार कायम राहिले, मात्र आता या योजनेत दिवसेंदिवस अपात्र महिलांची संख्या वाढू लागली आहे. विशेष म्हणजे १४ हजार २९८ पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. त्यामुळे आता सरकारकडूनच उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठीच लाडकी बहीण योजनेतील महिलांचे ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दोन महिन्यांच्या आत हे ई केवायसी करायचे आहे, असे न करणाऱ्या महिला या योजनेस अपात्र ठरणार आहेत. यासाठी सरकारने https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्या आधारकार्डचा क्रमांक टाकून आधार कार्ड प्रमाणिकरण करून घ्यायचे आहे. विशेष म्हणजे संबंधित महिलेला आपल्या पती किंवा वडिलांचे आधार प्रमाणिकरण केल्यानंतर महिलांना आपण सरकारी नोकरी करीत नसल्याचे घोषणापत्रही भरून द्यावे लागणार आहे.


