मुंबई: राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीआधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र यात बाेगस लाभार्थी घुसल्यानंतर या योजनेवर निर्बंध आणण्यात आले असून लाभार्थींना ईकेवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.
मात्र दोन महिने उलटले तरी अद्याप अर्ध्याही लाभार्थी महिलांचे ईकेवायसी पूर्ण झालेले नाही. तांत्रिक अडचणींमुळे २.४० कोटी महिलांपैकी केवळ ८० लाख महिलांचेच ईकेवायसी पूर्ण झाले आहे, त्यामुळे विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
महिला व बालविकास विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेत सध्या दोन कोटी ४० लाख महिला लाभ घेत आहेत. १८ सप्टेंबर महिन्यापासून या महिलांचे ईकेवायसी करण्यास सुरुवात झाली. मात्र कधी ओटीपी येण्यात अडचण तर कधी आधार संलग्नतेतील अडचणींमुळे महिलांना ईकेवायसीत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ८० लाख महिलांचे ईकेवायसी पूर्ण झाले आहे. १८ नोव्हेंबरआधी ईकेवायसी पूर्ण करण्याचे आव्हान असून त्यासाठी जनजगागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. पुढील आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त महिलांचे ईकेवायसी पूर्ण करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे
ही योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी १८ सप्टेंबरपासून ईकेवायसी करण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवून प्रतिदिन ५ लाख ऐवजी प्रतिदिन १० लाख करण्यात आली आहे. दूर झालेल्या तांत्रिक अडचणी व सर्व्हरची वाढलेली क्षमता पाहता १८ नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांचे ईकेवायसी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, काही प्रमाणात लाभार्थ्यांची ईकेवायसी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.


