Friday, November 7, 2025

अहिल्यानगर शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध

अहिल्यानगरः शहरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलिसांनी आज, गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. कोठला परिसरात ही मोहीम सुरू असताना कारवाईस विरोध करणाऱ्या जमावास पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे मोठी पळापळ झाली. रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटरसायकली पडल्या.

महापालिकेने मध्यंतरी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती. मात्र, ती नंतर थंडावली. त्यामुळे पुन्हा अतिक्रमणे झाली. आज ही मोहीम शहरातील पुणे रस्त्यावरील बसस्थानक ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील राज चेंबर्सपर्यंत राबवली गेली. त्यामध्ये टपऱ्या, पक्क्या दुकानांची अतिक्रमणे जेसीबी साह्याने जमीनदोस्त करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. पोलीस व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपाययोजनेवर चर्चा होऊन रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे व तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन महापालिकेच्या पथकाला अतिक्रमणे हटवण्यासाठी बंदोबस्त पुरवला.कोठला व माळीवाडा बसस्थानक परिसरात कारवाई सुरू होती. कोठला भागातील कारवाई सुरू झाल्यानंतर जमाव जेसीबीच्या समोर येऊन अडथळा निर्माण करू लागला. उपअधीक्षक भारती यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाई सुरू ठेवण्याचे आदेश दिले. जमावाचा विरोध तीव्र होताच पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. त्यामुळे पळापळ झाली. अतिक्रमणधारकांनीही आपले साहित्य घेऊन निघून जाणे पसंत केले. त्यानंतर टपऱ्या व दुकाने जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आली. या मोहिमेत सातत्य राहणार का, हाच नगरकरांचा प्रश्न आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles