नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भोंदू अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलं असून त्याची एसआयटीद्वारे चौकशी सुरू आहे. याच अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक आरोप केले होते. अशोक खरातला कोणी किती कॉल केले? याची यादीच अंजली दमानिया यांनी नुकतीच वाचून दाखवली होती.
याबाबत बोलताना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. अशोक खरात प्रकरणातील सीडीआर कोणी लीक केले? याची राज्य सरकार चौकशी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
“अशोक खरात प्रकरणातील सीडीआर कोणालाही प्राप्त करून घेण्याचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनाच तो अधिकार आहे. मात्र, या प्रकरणातील सीडीआर लीक कसा झाला? तो सीडीआर कोणी लीक केला? या संदर्भातील चौकशी राज्य सरकार करणार आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रकरणात फक्त आरोप-प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरोधात सबळ पुरावा असेल त्यांच्यावर कारवाई होईलच. मात्र, कोण-कोणाशी बोललं या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टम चालत नाही”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
अशोक खरात प्रकरणातील त्या सीडीआरची चौकशी होणार ; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
- Advertisement -


