Thursday, October 30, 2025

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी राजकीय पक्षांना निवडणुकीत अर्ज भरण्यास मर्यादा…

पुणे : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नावनोंदणी मोहिमेला मंगळवारपासून (३० सप्टेंबर) सुरुवात झाली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत ऑनलाइन मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुकांना ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रारूप मतदारयादी २५ नोव्हेंबर रोजी, तर अंतिम मतदारयादी ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन माेहिमेची माहिती दिली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

डाॅ. पुलकुंडवार म्हणाले, ‘पुढील वर्षी या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, या दोन्ही मतदारसंघांसाठी नव्याने मतदारयादी तयार करण्यात येते. २०२० मधील मतदाराला पुन्हा नव्याने नावनोंदणी करावी लागणार आहे. पदवीधर मतदारांना नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १८ आणि शिक्षकांना नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १९ भरावा लागणार आहे.’

‘पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदारनोंदणी करताना मतदार हा एक नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान तीन वर्षे आधी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाला असावा. शिक्षक मतदारसंघासाठी १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी मागील सहा वर्षांत किमान तीन वर्षे पूर्ण वेळ शिक्षकांना नावनोंदणी करता येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ऑनलाइन मतदारनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे डाॅ. पुलकुंडवार यांनी सांगितले.
पुणे विभागांतर्गत सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांत पदवीधर मतदारसंघात ४ लाख २० हजारांहून अधिक मतदार आहेत. शिक्षक मतदारसंघात ७२ हजारांहून अधिक मतदार आहेत. यंदा मतदारसंख्येत आणखी वाढ कशी होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. मात्र, राजकीय पक्षांकडून देण्यात येणारे गठ्ठा मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जाणार नाही, असेही डाॅ. पुलकुंडवार यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles