मतदानाला ४८ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असतानाच राज्यातील अनेक नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. प्रचार आज संपुष्टात येणार होता, पण त्याआधीच काही ठिकाणी नव्याने निवडणुका घेण्यात येत असल्याचे आयोगाकडून जाहीर कऱण्यात आले. नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात व्यथित उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केल्या होत्या. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आयोगाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
सोलापूर, पुणे, अमरावती, सांगली, सातारा, धाराशिवसह अनेक जिल्ह्यातील निवडणुका अथवा काही प्रभागातील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडणूक प्रक्रिया २३ डिसेंबरपूर्वी पूर्ण होणार आहे. सध्याच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. पण आता २०-२१ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढल्याचे दिसून येते.
अमरावती – अंजनगाव सुर्जी (नगरपरिषद निवडणूक)
अकोला – बाळापूर नगरपालिका
अहिल्यानगर – कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी (नगरपरिषद निवडणूक)
सातारा – फलटण , महाबळेश्वर (नगरपरिषद निवडणूक)
पुणे – बारामती, तळेगाव
यवतमाळ – दिग्रस पांढरकवडा, वनी
नांदेड – मुखेड, धर्माबाद (भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील एका एका जागेवर निवडणूक पुढे ढकली)
सोलापूर – मंगळवेढा
धाराशिव – प्रभाग क्र. 2 अ, 7 ब आणि 14 ब
जालना – भोकरदन 1 अ आणि प्रभाग 9 ब
चंद्रपूर – घुग्गुस
गोंदिया – वॉर्ड क्रमांक 3, 11 आणि 16
सुधारित निवडणूक कार्यक्रम
४ डिसेंबर: जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.
१० डिसेंबर (दुपारी 3 वाजेपर्यंत): नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम मुदत.
११ डिसेंबर: चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर.
२० डिसेंबर: मतदान.
२१ डिसेंबर २०२५: मतमोजणी.
२३ डिसेंबरपूर्वी: संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण.
जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते. परंतु अपीलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून दि.२२/११/२०२५ नंतर म्हणजेच दि.२३/११/२०२५ किंवा त्यानंतर देण्यात आलेला आहे, अशा नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणूका ०४/११/२०२५ रोजीच्या कार्यक्रमानुसार घेण्यात येवू नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.


