स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही, असा ठाम निर्धार अजित पवार गटाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेय. त्यांच्या विधानाने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजपने विधानसभेत मला पाडण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये देऊन माझ्या पुतण्याला विरोधात डमी कॅंडिडेट म्हणून उभे केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मी भाजपला एक तुकडा सुद्धा देणार नाही, असे आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.
किती मी लढलं पाहिजे आणि किती कुणाला दिलं पाहिजे, हे माझा क्षेत्रात मी ठरवणार आहे. माझ्या विरोधात भारतीय जनता पक्षाने माझ्या पुतण्याला डमी कॅंडिडेट म्हणून उभं केलं. मला पडायला भारतीय जनता पक्षाने पाच कोटी रुपये पुतण्याला दिले. परंतु मला असं सांगायचं आहे की मी त्यांना एक तुकडा सुद्धा देणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त घड्याळच चालेल आणि एकही जागा आम्ही दुसऱ्या पक्षाला देणार नाही, असे वक्तव्य आज आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी चामोर्शी येथे आयोजित जनकल्याण यात्रेत केलेले आहे.
धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, गेल्या ५० वर्षांपासून मी राजकारणात आहे. यादरम्यान कधी यश, कधी अपयश आले, पण जनतेने माझ्यावर विश्वास ठेवत मला विधानसभेत पाठविले आहे. मात्र, भाजपने
माझ्याविरोधात उभे केले, पाच कोटी रुपये खर्च केले, असा आरोप त्यांनी केला. कोनसरी येथील लोहनिर्मिती प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार मिळाला पाहिजे. सध्या भेंडाळा परिसरातील १४ गावांतील जमिनी उद्योगासाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली आहेत, पण आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून एक इंचीही जमीन जाऊ देणार नाही, कोणी शेतकऱ्यांना दबावात घेत असेल तर ते कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
गडचिरोली चामोर्शी “आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर ५१ पैकी ३२ जागा मागू; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढेल,” असा ठाम इशारा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारी दिला. “अहेरीत इतर पक्ष आहेतच कुठे?” असे विचारत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर उपरोधिक टीका केली. ते चामोर्शी नगरपंचायत प्रांगणात झालेल्या जनकल्याण यात्रेच्या सभेत बोलत होते. या सभेला आमदार अमोल मिटकरी, सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, मान्यवर उपस्थित होते. सभेपूर्वी शहरातून पायी फेरी काढण्यात आली.


