मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात असून राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यानंतर पुढील २१ दिवसांतच निवडणुका पार पडणार असून तत्काळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही जाहीर केल्या जाणार आहेत. अखेरच्या टप्प्यात महापालिका निवडणुका होणार आहेत, न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल.
महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची घोषणा सोमवारी किंवा मंगळवारी केली जाण्याची शक्यता वर्तविली जाते. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू होईल.
नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदतकार्यात गुंतलेली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबर महिन्यात होतील. जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होईल. जानेवारी २०२६ च्या १५ ते २० जानेवारीदरम्यान महापालिका निवडणुका घेण्याची तयारी आयोगाकडून करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी दुसऱ्या दिवशी हाती घेतली जाईल. तिन्ही टप्प्यातील निवडणुकीची एकत्र मतमोजणी घेणे हे वेळकाढूपणाचे ठरणार असल्याने निवडणूक यंत्रणेवरील ताण आणि मर्यादित मनुष्यबळ लक्षात घेता प्रत्येक टप्प्याच्या मतदानानंतर मतमोजणी घेण्यात येणार आहे.


