पळुन जावुन आत्महत्येचा निश्चय केलेले अल्पवयीन प्रेमीयुगुल
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचेकडुन ताब्यात.
अहिल्यानगर -प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 90/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय 16 वर्षे ही अहिल्यानगर येथे एका कॉलेजमध्ये इयत्ता 12 वी चे वर्गामध्ये शिक्षण घेवुन अहिल्यानगर या ठिकाणी मैत्रीणींसोबत राहण्यास होती. सदर अल्पवयीन मुलगी ही रात्रीचे वेळी जेवण करुन फेरफटका मारण्यासाठी रुमचे बाहेर गेली असता तिस अज्ञात आरोपीने कशाचे तरी अमिष दाखवुन पळुन नेलेले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, भिमराज खर्से, प्रशांत राठोड, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे, सोनल भागवत यांचे पथक तयार करुन अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते.
वरील पथकाने अपहरित मुलीचे नातेवाईक, मैत्रीणी यांचेकडे विचारपुस केली तसेच दिनांक 19/02/2026 रोजी अपहरित अल्पवयीन मुलीची व आरोपीची व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास गुन्ह्यातील पिडीत मुलगी ही जालना जिल्ह्यातील अल्पवयीन मुलाने पळवुन नेली असल्याचे व अपहरित मुलीसह सदरचा मुलगा हा नेवासा येथील बस स्टँड परिसरामध्ये थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ नेवासा या ठिकाणी जावुन खात्री करता बस स्टँड परिसरामध्ये एक मुलगा एक मुलगी संशयीतरित्या थांबलेले असल्याचे दिसुन आले. सदर मुलगा व मुलगी यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विश्वासाने विचारपुस करता त्यांनी त्यांचेमध्ये इंस्टाग्राम या सोशल मिडीया ऍ़प मधुन ओळख होवुन प्रेमसंबंध तयार झालेले असुन ते वैयक्तिक कारणास्तव पळुन जावुन आत्महत्या करणार असलेबाबत कळविले.
पथकाने ताब्यातील अल्पवयीन अपहरित मुलगी व विधीसंघर्षीत बालक यांचे मन परिवर्तन करुन त्यांना पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे हे करीत आहेत.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे पालकांना त्यांचे मुला – मुलींचे मोबाईलमधील सोशल मिडीया ऍ़पवर लक्ष ठेवुन असे प्रकार होणार नाही याची दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


