नगर तालुक्यात महाआघाडीची मोर्चेबांधणी !
लंके,तनपुरे ,गाडे यांनी ऐकले कार्यकर्त्यांचे म्हणणे : इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करीत मागीतली उमेदवारी
नगर तालुका महाविकास आघाडीने जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकीत आघाडी घेत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिवाळी फराळच्या निमित्ताने नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणुन घेत इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मुलाखती दिल्या. यामुळे नगर तालुक्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्याने राजकारण चांगलेच तापले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख व नगर तालुका महाआघाडीचे नेते प्रा. शशिकांत गाडे यांनी आज अहिल्यानगर शहरात दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचवेळी नगर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांचा गटनिहाय आढावा बैठकीचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. निलेश लंके, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे , प्रा. गाडे व कॉग्रेंसचे जेष्ठ नेते संपतराव म्हस्के यांनी तालुक्यातील गटनिहाय व गणनिहाय इच्छुकांचे उमेदवारी मागणी अर्ज भरून घेत प्रमुख कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकुण घेतले.
एकीकडे दिवाळी फराळाची मेजवाणी तर दुसरीकडे इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक पार पडली. इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीत महाआघाडीने तालुक्यात आघाडी घेत तालुक्यातील राजकीय वातावरण पेटवुन दिले. यावेळी
जेष्ठ नेते बाबासाहेब गुंजाळ , बाबुराव बेरड , किसनराव लोटके , बाळासाहेब हराळ , प्रविण कोकाटे, विक्रम राठोड, शरद पवार, राजेंद्र भगत , उद्धव दुसुंगे, माधवराव लामखडे , पोपट निमसे आदि उपस्थीत होते.
नगर तालुक्यात महाआघाडी अभेद्य
सन २००७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत नगर तालुक्यात शिवसेना, कॉग्रेंस व राष्ट्रवादी यांच्या महाआघाडीचा जन्म झाला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत हि महाआघाडी टिकुन राहिली. यदांच्या निवडणुकीतही नगर तालुक्यात महाआघाडी अभेद्य राहणार असल्याचा विश्वास तालुक्यातील नेत्यांनी आढावा बैठकीत व्यक्त केला.
उच्च शिक्षित तरूणांनी मागितली उमेदवारी
महाआघाडीच्या आढावा बैठकीत विविध व्यावसायीक पदवी प्राप्त तरूण तसेच पदव्युत्तर व पदवीधर झालेल्या तरूणांनी उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल करीत नेत्यांकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
उमेदवार लादणार नाही
अनेक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांचा प्राधान्याने विचार करावा, आयाराम – गयारामांना थारा देऊ नये अशी जाहिर मागणी नेत्यांकडे केली. यावेळी कोणत्याही गटात पक्ष उमेदवारी लादणार नाही. इच्छुकांमधुनच योग्य उमेदवारांची निवड होईल असे लंके व गाडे यांनी स्पष्ट केले. तसेच इच्छुकांची राजकीय ताकद , किती जनमत आहे , गावकऱ्यांची भूमिका आदि गोष्टी जाणुन घेणार आहोत असे लंके यांनी स्पष्ट केले.


