Saturday, December 13, 2025

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा ; नगरमधील श्रीराम जोशी यांचा समावेश

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

फलटण, : मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग 34 वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट (पत्रकारिता प्रशिक्षण) मध्ये कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार श्री. राजीव साबडे (पुणे) यांना सन 2025 चा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘विशेष दर्पण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन 2025 चे राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये राजीव साबडे यांच्यासह नांदेड येथील दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, गेली 15 वर्षे धाडसाने महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर साहित्य व पत्रकार संमेलने घेणारे मसूर, जि. सातारा येथील ‘गुंफण’ चे संपादक बसवेश्‍वर चेणगे, सलग 32 वर्षे दैनिक ‘पुढारी’च्या माध्यमातून पत्रकारिता करणारे सातारा येथील जीवनधर चव्हाण, महाराष्ट्र राज्य अधिस्विकृती समितीचे सदस्य तथा श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथील दैनिक ‘स्नेहप्रकाश’चे संपादक प्रकाश कुलथे, दैनिक ‘लोकमत’चे माणगाव, जि. सिंधुदुर्ग येथील पत्रकार विजय पालकर, अहिल्यानगर येथील दैनिक ‘नगर टाईम्स’चे कार्यकारी संपादक श्रीराम जोशी, यवतमाळ जिल्ह्यातील दैनिक ‘सकाळ’चे उमरखेड शहर प्रतिनिधी डॉ. अनिल काळबांडे, कोल्हापूर येथील मँगो एफ.एम. रेडीओ प्रसारण केंद्राचे केंद्रप्रमुख तथा साप्ताहिक ‘वर्तमान’ चे संपादक आशिष कदम यांचा समावेश आहे.

यावर्षापासून विशेष बाब म्हणून राज्यातील माहिती व जनसंपर्क विभागातील उत्कृष्ट शासकीय व अन्य क्षेत्रातील प्रभावी वृत्तांकन लेखन करणारे अधिकारी यांचेमधून एकाची ‘दर्पण’ पुरस्कारासाठी निवड करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. त्यानुसार यावर्षीचा असा पहिलाच ‘दर्पण’ पुरस्कार पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना देण्यात येणार आहे.

रोख रक्कम, शाल, पुष्पगुच्छ, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा चरित्र ग्रंथ व विशेष सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या सर्व पुरस्कारप्राप्त पत्रकारांना 6 जानेवारी 2026 च्या राज्यस्तरीय पत्रकार दिनादिवशी ‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग या जन्मगावी संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात एका विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याचेही रविंद्र बेडकिहाळ यांनी पत्रकात नमूद केले आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी या सर्व पुरस्कारप्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles