शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत असतात. पावसाळी अधिवेशनात आमदार निवासाच्या कँटिनमध्ये जेवाणावरून त्यांनी राडा घातला होता. संतापलेले गायकवाड टॉवेल आणि बनियनवर कँटिनमध्ये गेले अन् कर्मचाऱ्याला लाथा बुक्कयांनी मारलं. कुस्तीच्या आखाड्यासारखं मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे त्यांना एकनाथ शिंदेंकडून तंबी देण्यात आली होती. पण आमदार गायकवाड यांची वादग्रस्त विधाने काही थांबली नाहीत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही सोप्या राहिल्या नाहीत, त्यालाही तीन-तीन कोटी खर्च करावे लागतात. १०० बोकडेही द्यावे लागतात, एवढ्या खर्चीक निवडणुकीत कार्यकर्ते हे उद्ध्वस्त होतात. असं वादग्रस्त विधान करत गायकवाड यांनी पुन्हा एकदा शिंदेंना अडचणीत आणलेय.
एकनाथ शिंदे यांनी वारंवार समजूत काढूनही गायकवाड यांची जीभ घसरायची काही थांबत नाही. त्यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या खर्चा संबंधित वादग्रस्त विधान करून एकनाथ शिंदे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली, अशी टीका स्थानिक पातळीवर होतेय.
पुढे गायकवाड म्हणाले, आम्ही भाजप-शिवसेना(शिंदे) युतीला प्राधान्य देतो, आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुकीत युती करतो, पण जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक असते. तेव्हा आपण त्यांना वाऱ्यावर सोडतो. आता निवडणुका पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत, काही ठिकाणी एक-दोन तर काही ठिकाणी तीन कोटी रुपये खर्च करावा लागतो.
100 बोकड द्यावे लागते. त्यांना इतका खर्च झेपत नाही, मग त्यांनी काय मातीत जावे का? शिवसेना-भाजप युती झाली पाहिजे. चिखली, मलकापूर येथे जे धोरण ठरले असेल तेच धोरण बुलढण्यात ठरले तर आपण युती करण्यास तयार आहोत. कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे असे संजय गायकवाड म्हणाले.


