पुणे : राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी १चे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण (एससीईआरटी) परिषदेने जाहीर केले आहे. त्यानुसार १०, ११ व १३ ऑक्टोबर या कालावधीत मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची परीक्षा घेतली जाणार असून, शालेय वेळापत्रकानुसार सकाळ किंवा दुपारच्या सत्रात परीक्षा आयोजित करण्याचे स्वातंत्र्य शाळांना देण्यात आले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी याबाबतच्या सूचना राज्यातील विभागीय उपसंचालक, विभागीय विद्या प्राधिकरण, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, महापालिका प्रशासन अधिकारी, शिक्षण निरीक्षकांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, तसेच खासगी अनुदानित शाळांतील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी १ ही परीक्षा एकूण दहा माध्यमांत घेतली जाणार आहे. त्यात प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांचा समावेश आहे. प्रथम भाषा गणित, इंग्रजी या विषयांच्या लेखी परीक्षेनंतर त्या त्या दिवशी तोंडी परीक्षा वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी, विद्यार्थिसंख्या जास्त असल्यास दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घेण्यात यावी.
तालुकास्तरावर पोहोच करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका सुरक्षित राहतील, याची दक्षता घ्यावी. छायांकित प्रतीसाठी प्रश्नपत्रिका आणि इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रश्नपत्रिकांचे मोबाइलद्वारे छायाचित्र काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठवणे असे गैरप्रकार होणार नाहीत, प्रश्नपत्रिकांची गोपनीयता काटेकोरपणा पाळण्यात यावी. त्याबाबतची जबाबदारी तालुका समन्वयकांसह गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


