Tuesday, October 28, 2025

भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली,निष्ठावंत नेते माधव भंडारी यांची संधी पुन्हा एकदा हुकली

मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महायुती सरकारमध्ये या पाचपैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे. या तीन जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे. या तिन्ही नेत्यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते माधव भंडारी यांची संधी पुन्हा एकदा हुकली आहे. भाजपकडून विधानपरिषद उमेदवारांच्या दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत माधव भंडारी आणि अमरनाथ राजूरकर यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता अंतिम यादीत दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी मिळाली आहे.

माधव भंडारी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि संघ परिवारात निष्ठेने काम करत आहेत. 2014 साली सत्ता आल्यापासून माधव भंडारी यांना एकदाही महत्त्वाचे पद मिळाले नव्हते. राज्यात विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणूक आल्यानंतर प्रत्येकवेळी माधव भंडारी यांना संधी मिळणार, अशी चर्चा होते. मात्र, प्रत्यक्षात माधव भंडारी हे उमेदवारीपासून वंचित राहतात. आतादेखील त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे भाजप आणि संघ परिवरातील जुन्या-जाणत्यांच्या वर्तुळात याचे काय पडसाद उमटणार हे पाहावे लागेल.

विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी आज भाजपकडून तीन उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. अजितदादांच्या राष्ट्रावादी काँग्रेसकडूनही विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीकडून झिशान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रं तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. या तिघांपैकी एकाला विधानपरिषदेवर संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. राजेश विटेकर विधानसभेत गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिक्त आहे. या जागेसाठी 100 हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते. त्यामुळे अजित पवार आता विधान परिषदेवर कोणत्या नेत्याला संधी देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles