राज्यात विधानसभा निवडणुकांच्यानंतर सात महिन्यात १४ लाखांहून अधिक नव्या मतदारांची वाढ झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर या मतदारवाढीचा परिणाम होणार आहे. यावर राजकीय पक्षांकडून आक्षेप घेतला नसल्याचे म्हटले जात आहे. राज्यात घरबदलामुळे मतदार वाढल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्र राज्यातील मतदारांची संख्या २७ नोव्हेंबर २०२४ ते ३० जून २०२५ या दरम्यानच्या कालावधीत ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ वरुन ९ कोटी ८४ लाख ९६ हजार ६२६ हजार यांवर गेली आहे. याचा अर्थ १८,८०,५५३ नव्या मतदारांची मतदार यादीत नोंदणी झाली आहे. यातील जुन्या मतदारांची नावे वगळ्यास एकूण १४ लाख ७१ हजार ५०७ मतदार वाढल्याचे स्पष्ट होते.
लोकसभा, विधानसभा निवडणुकांदरम्यान सहा महिन्यात ४० लाखांपेक्षा जास्त मतदारांची वाढ झाली होती. यावर विरोधी पक्षाकडून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादीत वाढ झाल्याने विरोधी पक्षांकडून अद्याप आक्षेप घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी करण्याचा विचार होता. पण १ जुलै २०२५ पर्यंतची अद्ययावत यादीच अंतिम मानली जाईल असा निर्णय घेण्यात आला. मतदार नोंदणी ही सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे यामुळे हा निर्णय झाला आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.
नवे मतदार आकडेवारी –
ठाणे नवे मतदार – २,७१,६६६, वगळलेले मतदार – ४५,८००
पुणे नवे मतदार – २,२६,४५१, वगळलेले मतदार – ४३,९६१
पालघर नवे मतदार – १,०८,११६, वगळलेले मतदार – ११,०१६
मुंबई नवे मतदार – ३३,२०१, वगळलेले मतदार – १४,४६०
मुंबई उपनगर नवे मतदार – १,३९,८०२, वगळलेले मतदार – ४४,१७२


