महावितरणच्या पथकाने नगर तालुक्यातील खंडाळा गावात वीज चोरी शोधण्याची मोहीम राबवत एकाच दिवशी ४ ठिकाणी वीज चोरी पकडली असून या वीज चोरी करणाऱ्यांवर नगर तालुका पोलिस ठाण्यात ४ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत महावितरणचे सहाय्यक अभियंता दत्तात्रय देविदास दसपुते यांनी या फिर्यादी दिल्या आहेत. महावितरणच्या भरारी पथकाने ७ ऑगस्ट रोजी खंडाळा गावात वीजचोरी शोधण्याची मोहीम राबविली होती. त्यावेळी सचिन विजय गायकवाड यांनी ९४२ युनिट (१७ हजार ७१० रुपये), रोहिदास सहादू कांबळे ९५० युनिट (१८ हजार ४० रुपये), अमोल बारकू गिऱ्हे ९५० युनिट (१८ हजार ४० रुपये), पोपट चंद्रभान गव्हाणे ९४२ युनिट (१७ हजार ७१० रुपये) अशी वीज चोरी केल्याचे आढळून आले होते.
या चौघांना चोरी केलेल्या विजेची देयके व तडजोड रकमेची देयके देण्यात आली होती. मात्र त्यांनी विहित मुदतीत सदर रक्कम न भरल्यामुळे या चौघांच्या विरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५ प्रमाणे ४ वेगवेगळ्या फिर्यादी नगर तालुका पोलिस ठाण्यात १५ ऑक्टोबर रोजी देण्यात आल्या. त्यानुसार या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


