राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात सदनिक घोटाळाप्रकरणात सुनावण्यात आलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने मंगळवारी याबाबतचा निकाल दिला होता. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास माणिकराव कोकाटे यांची अटक ही अटळ मानली जात आहे. आज सकाळी माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते, अशी कुणकुण लागल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी तातडीने हालचाली सुरु केल्या आहेत. काहीवेळापूर्वीच अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा निर्णय अजितदादांवरच सोडल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी आजच्या भेटीत देवेंद्र फडणवीस यांना माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय तुम्हीच घ्या, असे अजित पवार यांना सांगितल्याचे समजते. ही भेट संपल्यानंतर अजित पवार हे मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या नियोजित बैठकीसाठी निघून गेले. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीला माणिकराव कोकाटे हजर राहणार की नाही, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, या बैठकीत माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या बाजूने नसला तरी अटक वॉरंट निघाल्यास पक्षाची कोंडी होऊ शकते. त्यामुळे आता अजित पवार आता काय निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या नावाने अटक वॉरंट काढण्यासाठी प्रथम वर्ग न्याय न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. कोकाटे यांच्याविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या अंजली दिघोळे राठोड यांनी हा अर्ज दाखल केला आहे. आज यावर सुनावणी होणार आहे. अंजली दिघोळे यांच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.


