पावसाळी अधिवेशनाच्या वेळी सभागृहात रमी खेळणं आणि वादग्रस्त विधान करणं माणिकराव कोकाटे यांना भोवलं आहे. वारंवार वादग्रस्त विधान करण्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कोकाटेंवर नाराज होते. आज सकाळपासून सह्याद्री बंगल्यावर याबाबत हालचाल सुरू होती. अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे यांच्यात कोकाटे यांच्यावर निर्णय घेण्यावरून बैठक झाली होती. आता महायुती सरकारनं माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं. कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्री पद काढून घेतल्यानंतर आता कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलीय. तर भरणे यांच्याकडील आधी असलेले क्रीडा आणि युवक कल्याण खाते कोकाटे यांच्याकडे देण्यात आले आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी पोस्ट केला होता. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव टाकला होता. परंतु कोकाटे यांचा राजीनामा न घेता फक्त त्यांच्या खात्यामध्ये बदल करण्यात आलाय.
क्रमांक शाकानि-२०२४/प्र.क्र.८६/रवका-१.-महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या नियम ५ च्या तरतुदींस अनुसरून, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यावरुन, याद्वारे, शासकीय अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक शाकानि-२०२४/प्र.क्र.८६(१)/रवका-१, दिनांक २१ डिसेंबर २०२४, यामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत:-
उक्त अधिसूचनेमध्ये,- (एक) नोंद क्रमांक २२ मध्ये, “श्री. दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे” यांच्या नावासमोरील, स्तंभ (२) मधील, “विभाग किंवा त्यांचे भाग” या शीर्षाखालील, “क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ” या मजकुराऐवजी, “कृषी” हा मजकूर दाखल करण्यात येईल; (दोन) नोंद क्रमांक २५ मध्ये, “अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे” यांच्या नावासमोरील, स्तंभ (२) मधील, “विभाग किंवा त्यांचे भाग” या शीर्षाखालील, “कृषी” या मजकुराऐवजी, “क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ” हा मजकूर दाखल करण्यात येईल, असं आदेशात म्हटलं आहे.


