Wednesday, November 5, 2025

वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर मनोज जरांगे संतापले , म्हणाले डॉक्टरांना निलंबित करा…

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांचं हे आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे शुक्रवारपासून आंदोलनाला बसले असल्यामुळे त्यांना अशक्तपणाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे त्यांची डॉक्टरांच्या टीमकडून वेळोवेळी तपासणी केली जात आहे.

दरम्यान, आज रात्री डॉक्टरांची टीम वैद्यकीय तपासणीसाठी आली असता मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणी नाकारली. मात्र, याचवेळी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर मनोज जरांगे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. तपासणीसाठी आलेल्या सर्व डॉक्टरांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी थेट आरोग्यमंत्र्यांकडे केली.
मनोज जरांगे काय म्हणाले?

“ते आमच्या डॉक्टरांकडे तपासणी यंत्र मागत होते. तेव्हा मी आलेल्या डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही येथून जा. हे असले लबाड लोक आहेत, त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचं वाटोळं व्हायला लागलं आहे. हे डॉक्टर फुकट पगार खातेत. या ठिकाणी आलेले सर्व डॉक्टर निलंबित करायला पाहिजेत. आरोग्यमंत्र्यांना मी जाहीर सांगतो, जे आता तपासणीसाठी आले होते ते सर्वजण निलंबित करा. ते खोटं बोलून एखाद्याचा जीव घेतील. हे खोटे आरोप करतात. हे लोक खोटारडे आहेत, हे ध चा म करतात”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

“मी न्यायदेवतेचं मनापासून कौतुक करतो आणि जाहीरपणे सांगतो, माझं हे शेवटचं सांगणं आहे. आंदोलकांच्या ज्या गाड्या रस्त्यावर आहेत त्या तुम्ही तातडीने मैदानात नेहून लावा. तुम्ही देखील मैदानात थांबा. जर तुम्हाला आरक्षण हवं नसेल आणि तुम्हाला कोणाचं ऐकून गोंधळ करायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावी जाऊ शकता. मला आता पाणी पिऊन बोलावं लागत आहे. मग तुम्ही ठरवा की मला किती वेदना होत असतील. फक्त तुमच्यासाठी मी एवढे कष्ट सहन करत आहे”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केलं.

“मी समाजाचा अपमान होईल असं कधीही वागत नाही. मला जर पाणी पिऊन तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काहीही उपयोग नाही. मुंबईकरांना त्रास होईल असं कोणीही वागू नका. मला वाटतं की अंतरवाली सराटीत पण हेच पोरं होते. पत्रकार देखील होते. मात्र, कधीही कोणाला त्रास दिल्याचं ऐकायला आलं नव्हतं. पण मुंबईत त्रास दिल्याचं ऐकायला येतंय. त्यामुळे आमचा संशय बळावतोय. आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे. कोणीतरी षडयंत्र करत आहे”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles