मराठा समजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील २७ तारखेला मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत फडणवीस सरकारला शेवटच्या दोन दिवसांची मुदत दिली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चाचा मार्ग बदलल्याची माहिती दिली. याआधी मराठा समाज माळशेज घाट, कल्याणमार्गे मुंबईमध्ये धडकणार होता. पण मुंबईतील वाहतूक कोंडी वाढू शकते, त्यामुळे आता मोर्चाचा मार्ग बदलला आहे. मनोज जरांगे पाटील आता जुन्नर, लोणावळामार्गे मुंबईच्या आझाद मैदानात पोहचणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सरकाराला इशारा तर दिलाच, त्याशिवाय मराठा समजाला सर्व काम सोडून मुंबईला जाण्याची तयारी करण्याची विनंती केली आहे.
मराठा समाजानं २९ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मोठं आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘चलो मुंबई’ आंदोलनापूर्वी त्यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीका केली. तसेच ‘चलो मुंबई’ बदलेल्या मार्गाबाबात माहिती दिली.
आंदोलनाचा मार्ग कसा असेल?
२७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ते मुंबईच्या दिशेनं मोर्चा छेडण्यासाठी निघणार आहेत.
नंतर त्यांचा जुन्नरमध्ये मुक्काम असेल.
२८ ऑगस्ट रोजी शिवनेरी गडावर दर्शनासाठी जातील. दर्शन घेतल्यानंतर ते राजगुरू खेड मार्गे चाकणच्या दिशेनं जातील.
चाकणहून जरांगे पाटील यांचा मोर्चा तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशीमार्गे पुढे जाईल.
२८ ऑगस्ट रोजी ते सायंकाळी आझाद मैदानावर पोहोचतील.
२९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर त्यांचं बेमुदत उपोषणाला सुरूवात होईल.
आंदोलनाच्या मार्गाबाबत माहिती दिल्यानंतर जरांगे पाटील म्हणाले, ‘आम्हाला वाहतूक कोंडी करायला जायचं नाही आहे. मुंबईतील कोणताही रस्ता आम्हाला द्या. आम्हाला न्यायासाठी आंदोलन करायचं आहे. कुणाला त्रास होईल, यासाठी नाही. आम्ही चाकणमार्गे मुंबई गाठणार आहोत. कल्याणमार्ग नाही’, असं जरांगे पाटील म्हणाले.


