Saturday, February 21, 2026

राज्य महिला आयोगातील अनेक पदे रिक्त;पाच वर्षांमध्ये निधीत मोठी कपात,तक्रारींचा वाढता ओघ

मुंबई : मुळशीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या राज्य महिला आयोगावर एकही अशासकीय सदस्य नेमण्यात आलेला नाही. आयोगाच्या कर्मचाऱ्यांची निम्मी पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. गेल्या पाच वर्षांत आयोगाच्या निधीत कपात केली जात असून राज्यभरातून दररोज येणाऱ्या शेकडो महिलांच्या तक्रारी अवघे तीन समुपदेशक हाताळत असल्याची माहिती समोर आली आहे.

‘राज्य महिला आयोगा’कडे वर्षाला सरासरी ९ हजार तक्रारी प्राप्त होतात. अध्यक्ष व पोलीस महासंचालकांखेरीज आयोगावर सहा अशासकीय सदस्य नेमण्याचा नियम आहे, मात्र शासनाकडे सदर प्रकरणाची नस्ती अनेक महिने प्रलंबित आहे.

आयोगाला ३५ पदे मंजूर आहेत. पैकी १८ पदे रिक्त आहेत. आयोग कार्यालयात दैनंदिन सरासरी ७५ महिला प्रत्यक्ष तक्रारी करतात. मात्र, त्यांना सल्ला देण्यासाठी आयोगामध्ये अवघे तीन समुपदेशक कार्यरत आहेत. २०१७ नंतर आयोगाने संकेतस्थळावर वार्षिक अहवाल सादर केलेला नाही. वर्ष २०१८-१९ मध्ये आयोगाला ८ कोटी १४ लाख इतके सहाय्यक अनुदान दिले होते. त्यामध्ये दरवर्षी कपात करण्यात येत असून मागच्या वर्षी हा निधी ४ कोटी ६३ लाखांवर आला. महिलांच्या छळाच्या तक्रारींचे व्यवस्थापन करण्यासाठी पोर्टल नाही.

आयोगाकडे मेल, दूरध्वनी, टपाल, परहस्ते, प्रत्यक्ष या मार्गाने दरमहिना ७०० ते ८०० तक्रारी येतात. समुपदेशन करून तोडगा, कायदेशीर सल्ला किंवा पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश या तीन प्रकारे आयोगाकडून त्याच दिवशी तक्रारीवर निर्णय घेतला जातो. उपलब्ध मनुष्यबळ व साधनसामग्रीत कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू आहे. – पद्माश्री बैनाडे, प्रभारी सदस्य-सचिव, राज्य महिला आयोग
साडेतीन वर्षांत एकही शिफारस नाही

आयोगाच्या विद्यामान अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत महिलांच्या समस्या दूर करण्यासंदर्भात आयोगाने एकही अभ्यास केला नाही. सरकारला कोणतीही शिफारस केलेली नाही. महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत हा विभाग येत असून या विभागाच्या मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे आहेत.राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये हुंड्यासाठी छळांच्या तक्रारी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राज्य महिला आयोगाकडे मात्र हुंड्यासाठी छळ या तक्रारीची वर्गवारी केलेली नाही. सामाजिक विषय या ढोबळ वर्गवारीत हुंडापीडितांच्या तक्रारी वर्ग केल्या जातात. धक्कादायक म्हणजे वर्ष २०२४ मध्ये राज्यात १४९ महिलांचा हुंडाबळी गेले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles