मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झालेत… त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चाललाय…एकीकडे ओबीसी समाजाचे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत.. अशातच नागपूरच्या समता परिषदेत जरांगे पाटलांना मदत करणाऱ्या आमदार, खासदारांना निवडणुकीत धडा शिकवा, असा हल्लाबोल छगन भुजबळांनी केलाय. तर दुसरीक़डे मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना निवडणुकीत पाडा, असा पलटवार जरांगेंनी केलाय… मुंबईतल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा दिला होता.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे, भास्कर भगरे, निलेश लंके यांच्यासह आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार अभिजीत पाटील यांनीही मराठा आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता.
त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके,विजयसिंह पंडित यांनीही मराठा आंदोलनात जरांगेंना साथ दिली होती.. तसंच ठाकरेसेनेचे खासदार बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर यांच्यासह आमदार कैलास पाटीलही जरांगेंच्या आझाद मैदानातील व्यासपीठावर दिसले होते… त्यामुळे याचं आमदार, खासदारांविरोधात ओबीसी समाज आक्रमक झालाय… दरम्यान ओबीसी आणि मराठा समाजाकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधीच पाडापाडीच्या राजकारणावर भाष्य केलं जात असल्यानं निवडणुकीतही याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरक्षणाची ही लढाई आता निवडणुकीच्या रिंगणातही पाहायला मिळणार आहे.. त्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं निवडणुकीतील चित्र राज्याच्या जातीयवादाच्या राजकारणाला आणखी खतपाणी घातलं जाणार, हे निश्चित


