सरकारने आम्हाला आरक्षण दिलं तर त्यांचे गुलाल लावून आभार मानणार, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईतून हालणार नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला. कुणीही आडवं आलं तरी आम्ही 29 ऑगस्ट रोजी मुंबईला जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार असंही जरांगे म्हणाले. लातूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट रोजी ‘चलो मुंबई’ची हाक दिली. त्याच्या नियोजनासाठी ते ठिकठिकाणी बैठका घेत आहेत. जरांगे लातूरमध्ये असताना पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी त्यांची भेट घेतली. मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू असा शब्द सरनाईकांनी दिला.
कुणीही आडवं येवो, मुंबईला जाणारच
मनोज जरांगे म्हणाले की, “आम्हाला आरक्षण दिलं तर सरकारचं गुलाल लावून आभार मानणार. कुणीही आडवं आलं तरी आम्ही मुंबईला जाणारच. माझा जीव गेला तरीही मी मुंबईत जाणारच. आझाद मैदानात बसून आरक्षणाची लढाई लढणार. यावेळी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण घेऊनच परत येणार.”मनोज जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, “माणूस किती दलबदलू असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांनी तसं वागू नये. त्यांना सत्तेवर ठेवायचं नसतं तर मराठ्यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं का? त्यांच्या मनात काय आहे ते माहिती नाही. पण आम्ही शांततेत मुंबईत जाणार, आरक्षण घेणार.”
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीस बघून घेतील. सत्ता असेल तर सगळं काही करता येईल या गैरसमजातून त्यांनी बाहेर यावं. तुम्ही एखाद्याला हात लावून दाखवा, मग सांगतो असा इशारा जरांगेंनी दिला.
मराठ्यांच्या मुलांना व्हॅलिडिटी देत नाहीत. धनगरांना जसं फसवलं तसंच ते मराठ्यांना फसवत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी काही लोक असे पाळले आहेत की वेळ आली की ते कामाला लागतात, मराठ्यांच्या विरोधात बोलतात अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी ज्या मार्गी मुंबईला जायचं आहे त्या मार्गात काही बदल करण्यात आल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. यावेळी अंतरवालीतून पैठणमार्गे आम्ही पुढे जाणार. शिवनेरीत मुक्काम करणार. त्यानंतर चाकणमार्गे वाशी आणि आझाद मैदान अशा मार्गाने जाणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.


