मराठी आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी कर्करोगाने निधन झालेय. आज पहाटे ४ वाजता मीरा रोड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रिया मराठे यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
‘पवित्र रिश्ता’, ‘या सुखांनो या’, ‘बडे अच्छे लगते हैं’, आणि ‘तू भेटशी नव्याने’ यांसारख्या मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. सध्या त्या ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत रागिणी अग्निहोत्री ही खलनायकी भूमिका साकारत होत्या. त्यांच्या निधनाबाबत अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रिया मराठे हिने मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केलेय. प्रिया मराठेचा जन्म २३ एप्रिल १९८७ रोजी ठाण्यात झाला होता. २००६ मध्ये ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या हिंदी मालिका आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले. तिने ‘विघ्नहर्ता महागणपती’ आणि ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ (२०१६) या मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. प्रिया सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सक्रिय नव्हते. २४ एप्रिल २०१२ रोजी अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी लग्न केले होते.


