सीना नदीला महापूर : पूरग्रस्त भागांची पाहणी केली
 गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला आहे. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी शिरून नागरिकांचे हाल झाले आहेत. अनेक घरांमध्ये गुडघ्याएवढं पाणी साचल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
 ही माहिती मिळताच मी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. माझ्यासोबत आयुक्त यशवंत डांगे आणि स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे होते. आम्ही गोरे वस्ती, डॉन बॉस्को, ठाणगे मळा, दातरंगे मळा, नेप्ती नाका व सावेडी परिसराची पाहणी केली. तेथील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच महापालिका प्रशासनाला तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले.
 सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी मी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. कामालादेखील सुरुवात झाली होती. मात्र काही धनदांडग्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगिती मिळवली. आजच्या परिस्थितीत महापालिकेने पूरस्थितीची सविस्तर माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करून नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी माझी मागणी आहे.
 दरम्यान, प्रभाग क्रमांक ८ मधील गोरे वस्ती, गणेश चौक, पितळे कॉलनी व संभाजीनगर भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर घरात शिरले आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी कुमारसिंह वाकळे यांनी सांगितले की आंबेडकर चौक ते सीना नदीपर्यंत 900 एमएम व्यासाची गटार योजना लवकरच मार्गी लागेल.
सीना नदीला महापूर : पूरग्रस्त भागांची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी
- Advertisement -


