भाजपा नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाजपा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला असून त्यांच्या जागी ही जबाबदारी आता आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, बावनकुळे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना एक भावूक पत्र लिहिलं आहे. याद्वारे त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्काळातील महत्त्वाच्या घटनांकडे लक्ष वेधलं आहे. तसेच कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेआभार मानले आहेत.
बावनकुळे यांनी पत्रात म्हटलं आहे की “प्रिय कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आपले मनापासून आभार. ‘कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे!’ या कविवर्य ना. धो. महानोरांच्या कवितेतील ओळींप्रमाणे माझी भावनिक अवस्था झाली आहे. साधारण ३५ वर्षांपूर्वी कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्याच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भिंती रंगवणे, पत्रके वाटणे, गावोगाव कधी सायकलवर, कधी मोटरसायकलवर, तर कधी पायीच प्रवास करणे इथपासून सुरू झालेला माझा प्रवास भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत येऊन पोहोचला, हे माझ्यासाठीच अविश्वसनीय आहे.”
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की कधीतरी भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून आपण काम करू. सामान्यांमधीली असामान्य शक्तींना जागृत करणे हीच तर आपल्या पक्षाची किमया आहे. १२ ऑगस्ट २०२२ रोजी जेव्हा मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा आनंद तर होताच पण त्याहून अधिक जबाबदारीचे दडपण होते. अनेक पिढ्यांनी, अतिशय कष्टाने, रक्ताचे पाणी करून राज्यात हा पक्ष उभा केला, वाढवला आणि त्यातून माझ्यासारखे कित्येक कार्यकर्ते घडले. उत्तमराव पाटील, ना. स. फरांदे, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी जे पद भूषवले, त्या पदाची जबाबदारी स्वीकारणे हे माझ्यासाठी शिवधनुष्य होते. ते शिवधनुष्य समर्थपणे पेलण्याचा मी माझ्या परीने व आपल्या साथीने प्रामाणिक प्रयत्न केला.”
“या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मी महाराष्ट्रभर अनेकवेळा प्रवास केला. महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात, चांद्यापासून बांद्यापर्यंत, तळागाळापर्यंत व्यक्तिशः पोहचण्याचा प्रयत्न केला. बूथवरचे सामान्य कार्यकर्ते ते राज्यातील नेते अशा सर्वांमध्ये योग्य समन्वय ठेऊन पक्षाचा विस्तार कसा होईल यासाठी प्रयत्न केले. आपण, महाराष्ट्रामध्ये संघटनपर्व यशस्वीपणे राबवत दीड कोटी सदस्यसंख्या असलेला भारतीय जनता पक्ष राज्यातील सर्वात जास्त सदस्यसंख्या असलेला पक्ष बनवला ही माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे.”
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याची खंत
महसूलमंत्री म्हणाले, “माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दोन मोठ्या निवडणुका झाल्या. त्यातील लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश आले नाही. त्यादिवसापुरती माझ्याही मनात निराशा होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आपण विचारमंथन केले, झालेल्या चुकांमधून शिकलो, मरगळ झटकून मेहनत केली आणि विधानसभा निवडणुकीत वाजत गाजत विजयश्री खेचून आणली. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपा-महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले. या यशाचे संपूर्ण श्रेय कार्यकर्ते म्हणून केवळ आपल्यालाच आहे. अपयशाची निराशा आणि यशाचा आनंद असे दोन्ही शिकवणारा हा अध्यक्षपदाचा प्रवास होता.”
“मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे व्यक्तिमत्व देशाचे नेतृत्व करत असताना मला ही जबाबदारी मिळाली. मोदीच्या विकसित भारताच्या संकल्पात भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला योगदान देण्याची संधी मिळाली आणि आता राज्याचा महसूल मंत्री म्हणून ही संधी मला मिळत आहे याचा मला सर्वाधिक आनंद आहे. पंतप्रधानांचा व सर्वच वरिष्ठ नेत्यांचा मी आभारी आहे. पक्षातील मान्यवरांनी माझ्यावर विश्वास दाखवला यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. मला आशा आहे की या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतून मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला असेल.”
“माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मी सर्वांची माफी मागतो”


