“ज्यांनी मतदान केलं त्यांनी निधी मागू नये. मतदानाला निधी देता येत नाही, पण कामाला देता येतो. व्यक्तीला निधी देणं आणि कामाला निधी देणं यात मोठा फरक आहे,” अशा स्पष्ट शब्दांत मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली. पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर आहेत. जालना पोलीस आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जालन्यात पोलिसांच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. कॅमेऱ्याच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडेंनी हजेरी लावली. यावेळी पकंजा मुंडे म्हणाल्या, ‘आता पहिला नियोजन समितीचा निधी माझ्या हातात आला आहे. सुरुवातीला मी आले तेव्हा माझ्या हातात फक्त भाषण देण्याचं काम होतं. पण आता पर्यावरण आणि पशुसंवर्धन खात्यामार्फत जालना जिल्हा राज्यात क्रमांक एकवर राहील, अशी कामं करणार आहे’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
‘आमचे पालकमंत्री अजित पवार यांनी परवानगी दिल्यास बीड जिल्ह्यातही पशुसंवर्धन आणि पर्यावरण क्षेत्रात काम करेन. मात्र, ज्यांनी केवळ माझ्यासोबत फोटो किंवा सेल्फी काढला, किंवा मतदान केलं, त्यांनी निधीची अपेक्षा ठेवू नये. आपण नेहमीप्रमाणे कामाच्या आधारे निधी मिळवण्याची पद्धत ठेवूया’, असंही यावेळी पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.
‘मतदानाला निधी देता येत नाही ,कामाला निधी देता येतो. व्यक्तीला निधी देण आणि कामाला निधी देणे याच्यात फरक आहे’, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. ‘पालकमंत्री ज्या जिल्ह्याचे असतात, तिथील लोक त्या जिल्ह्यात काम करू शकतात. पण मी ठरवलं आहे की बाहेरच्या जिल्ह्यांतील लोकांनी इथे येऊन काम करायचं नाही’, अशी तंबीही पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना दिली.
यावेळी, ‘माझ्या राजकीय आयुष्यात सर्वात जास्त आधार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा होता. त्यानंतर आता बहीण म्हणून पंकजा मुंडे यांचा आहे’ अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली.


