अहिल्यानगर -उध्दव ठाकरे व मनसे तसेच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या केवळ चर्चाच सुरू आहेत. या पक्षांचे अधिकृत प्रवक्ते ज्यावेळी यावर स्पष्ट भाष्य करतील, त्यावेळी त्यावर आम्ही तातडीने आमचे मत मांडू, असे स्पष्टीकरण पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी येथे दिले. संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच खरी शिवसेना कोणती हे कोर्टात सिद्ध झाले आहे. पक्षाचे चिन्ह व नाव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. विधानसभेच्या 80 पैकी 61 जागा आम्ही जिंकल्या आहेत.
जनतेनेही कोणती शिवसेना खरी हे यातून सिद्ध केले आहे. त्यामुळे दूध का दूध व पाणी का पाणी सिद्ध झाले आहे, तरीही नाहक शिवसेना खरी कोणती अशी चर्चा घडवली जाते, अशी खंत मंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. शिंदे सेनेचा कार्यकर्ता मेळावा नगरच्या माऊली सभागृहात झाला. त्यासाठी मंत्री देसाई नगरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. उबाठा व मनसे एकत्र येण्याबाबत नुसत्याच चर्चा सुरू आहेत. या दोन्ही पक्षांचे अधिकृत प्रवक्ते याबाबत काहीच बोलत नाहीत. तशीच स्थिती राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची आहे. त्यांचेही अधिकृत प्रवक्ते एकत्रीकरणाबाबत काहीच बोलत नाहीत. त्यामुळे यावर आता काय प्रतिक्रिया देणार या चारही पक्षांचे अधिकृत प्रवक्ते ज्यावेळी स्पष्ट भूमिका मांडतील, त्यावेळी आम्ही तातडीने त्यावर मत व्यक्त करू, असे स्पष्ट करून देसाई म्हणाले, संजय राऊत यांना आम्ही कोणीही गांभीर्याने घेत नाही, असे म्हणून त्यांच्याविषयीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.
नगरचा पर्यटन विकास करू
 अहिल्यानगर शहराजवळील पिंपळगाव माळवी तलावाची मनपाची जमीन येथे पर्यटन केंद्र उभारणे तसेच भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासाचा विषय पर्यटन मंत्री म्हणून मार्गी लावू, अशी ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली.
जागा वाटपाबद्दल शंका नाही
 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच्या तीनही घटक पक्षांमध्ये होणार्या जागा वाटपाबद्दल कोणतीही शंका नाही, असे स्पष्ट करून मंत्री देसाई म्हणाले, भाजप, शिंदे सेना व अजित पवार गटाच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांची समन्वय समिती आहे. ती प्रत्येक जिल्ह्याचा स्थानिकस्तरावर आढावा घेऊन तिन्ही पक्षाचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडणार आहे व हे तिन्ही नेते त्यानंतर अंतिम निर्णय घेणार आहेत. या तिन्ही नेत्यांचा नियमितपणे या विषयावर विचार विमर्शही होत आहे. विधानसभेत तिन्ही पक्षांनी मिळून 237 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा वाटपाबाबत काहीही शंका नाही व महायुती आहे, ती पुढेही राहावी व याच विचारावर निवडणूक लढवावी म्हणून लढण्याचीच मानसिकता असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.


