अहिल्यानगर -मंत्री अब्दुल सत्तार यांचा भाचा असल्याचे सांगून अल्पसंख्याक मंत्रालयातून हायमॉक्स लाईटचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्याच्या एका व्यक्तीने अहिल्यानगरमधील दोन शासकीय ठेकेदारांना तब्बल 9 लाख 40 हजार रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोतया भाच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असिफ अत्तार खान (रा. कोंढवा, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन गोरख रासकर (वय 28, रा. हंगा, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सचिन रासकर आणि त्यांचे मित्र गणेश काळे हे शासकीय विद्युत ठेकेदार आहेत. 2024 मध्ये मुंबईतील मंत्रालयात त्यांची ओळख असिफ खान याच्यासोबत झाली. त्याने आपण अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा भाचा असल्याचे सांगून मंत्रालयात मोठी ओळख असल्याचे भासविले. तसेच, हायमॉक्स लाईट बसवण्याचे काम मंजूर करून देतो, असे सांगून विश्वास संपादन केला.
कामासाठी 9 लाख रूपये लागतील, असे त्याने सांगितल्यानंतर फिर्यादी रासकर व काळे यांनी अहिल्यानगरच्या मार्केटयार्ड येथील काळे यांच्या कार्यालयात त्याला 8 लाख रूपये रोख दिले. त्यानंतर उरलेल्या रकमेसाठी त्याने वेळोवेळी फिर्यादी रासकर यांच्याकडून ऑनलाइन स्वरूपात 1 लाख 40 हजार रूपये घेतले. दरम्यान, पैसे घेतल्यानंतर मात्र तो काम देण्यास टाळाटाळ करू लागला व नंतर फोन उचलणेही बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन रासकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे अधिक तपास करत आहेत.


