श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गावामध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा पार पडण्यापूर्वीच, तिला एका अल्पवयीन मुलाने पळवून नेले आहे. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झालेली असतानाच ऐनवेळी हा प्रकार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा शहराच्या पश्चिम भागात असलेल्या एका गावातील ही घटना आहे. संबंधित मुलीचा विवाह ठरला होता आणि घरात लग्नाची लगबग सुरू होती. नातेवाईक जमले होते आणि विवाहाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, विवाहाच्या आदल्या दिवशीच मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली. पालकांनी शोधाशोध केली असता, तिला एका मुलाने पळवून नेल्याचे निष्पन्न झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पळून गेलेली मुलगी अवघ्या १० वीत शिकत असून ती अल्पवयीन आहे. तिला पळवून नेणारा मुलगा देखील अल्पवयीन असून तो ११ वीचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुलगी बेपत्ता झाल्याचे आणि तिला पळवून नेल्याचे लक्षात येताच पालकांनी तत्काळ श्रीगोंदा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत सोमवारी (दि.१६) पहाटे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुलाचा आणि मुलीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. लग्नाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या ‘नाट्यमय’ घटनेमुळे तालुक्यात शिक्षणाचे वय असलेल्या मुलांमधील अशा प्रवृत्तीवर चिंता व्यक्त केली जात आहे.


