अहिल्यानगर-अल्पवयीन मुलीला (वय 16) घरात बोलावून धमकावणे, त्याबाबत विचारणा केली असता आई व मुलाला शिवीगाळ करीत चापटाने मारहाण करणे तसेच जातीवाचक अपशब्द वापरल्याची घटना रविवारी (31 ऑगस्ट) रात्री 11 वाजताच्या सुमारास आदर्शनगर, कल्याण रस्ता भागात घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.जितेंद्र अनिल परळकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या कुटुंबात पती, मुलगा आणि मुलगी असे राहतात. फिर्यादी मुलगी आणि जितेंद्र यांची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. या दरम्यान दोघांमध्ये मोबाईलवरून संपर्क होत असल्याची माहिती कुटुंबाला मिळाल्याने मुलीला समजावण्यात आले होते. रविवारी रात्री 11 वाजता फिर्यादीच्या मुलाने त्यांना फोन करून मुलगी जितेंद्र परळकर याच्या घरी दिसल्याची माहिती दिली. यानंतर फिर्यादी तातडीने तेथे गेल्या असता, मुलगी, मुलगा व जितेंद्र घरात उपस्थित होते. त्यावेळी जितेंद्र हा शिवीगाळ करत होता. फिर्यादींनी मुलीला विचारले असता, तिने सांगितले की, जितेंद्र याने फोन करून जर तू माझ्या घरी आली नाहीस तर आपले दोघांचे फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिली होती. त्यामुळे भीतीपोटी ती त्याच्या घरी गेल्याचे तिने सांगितले.
यानंतर फिर्यादीने जितेंद्र यास मुलीला का घरी बोलावली असा जाब विचारला असता, त्याने उलटसुलट बोलणे सुरू केले. तुझी मुलगीच मला फोन करत असे, मी तिचा काय मागे लागतो काय असे म्हणत त्याने जातीवाचक अपमानास्पद शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर मुलास मारहाण केली. सदर घटनेने कुटुंब व्यथित झाले असून, फिर्यादीने कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.


