लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना

राहुरी : लग्नाचे अमिष दाखवत राहुरी परिसरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी राहुरी पोलिसात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश सतीश तोडकर (रा.आष्टी,बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो दोन वर्षांपासून तरुणीला त्रास देत होता. ‌‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे‌’, असे म्हणून तो तिचा पाठलाग करत असे. पीडितेने वारंवार नकार देऊनही त्याने फोन आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तिला त्रास देणे सुरूच ठेवले होते. 25 मार्च 2026 ला दुपारी महेश तोडकर दुचाकीवरून राहुरी बसस्थानक परिसरात आला.

तिथे तरुणीला दमदाटी केली आणि लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेले. बळजबरीने अत्याचार करत तिला धमकी दिली. तरुणीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत महेश तोडकर विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 87, 78 (1), 351 (2), 351 (3) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा पोक्सो 2012 च्या कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१४ वर्षीय मुलीचा बालविवाह उघड; आई-वडिलांसह सहा जणांवर गुन्हा

घारगाव : एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लाऊन, तिचे बालपण हिरावणाऱ्या आई-वडिलांसह नवरदेव, सासू, सासरे आणि लग्न जुळवणाऱ्या ‌‘मामा‌’च्या हातातही आता कायद्याच्या बेड्या पडणार आहेत. पोलिसांनी याप्रकरणी घारगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

साकुर पठार भागातील एका गावात गुरुवार दि.5 मार्च रोजी एक 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह अत्यंत गुपचूप व साध्या पद्धतीने लावून देण्यात आला होता. मात्र, या अनिष्ट प्रथेची माहिती मिळताच अहिल्यानगर येथील ‌‘स्नेहालय‌’ संस्थेच्या ‌‘उडान‌’ प्रकल्पाने तातडीने सूत्रे हलवली. स्थानिक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी,ग्रामपंचायत प्रशासन व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने अगदी गुप्तता बाळगत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. सबंधित गावचे पोलिस पाटील व स्थानिक बाल संरक्षण समितीने या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली आहे.

चौकशीदरम्यान मुलीचे वय लग्नासाठी कायदेशीररीत्या अपात्र असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कोणत्याही दबावाला बळी न पडता, स्नेहालयच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने घारगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन मंगळवार दि.24 मार्च रोजी सरकारी फिर्याद नोंदवली गेली आहे. 14 वर्षीय बालिकेचा विवाह लावून तिचे बालपण संपविण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. या प्रकरणात साकुर पठार भागातील नवरदेव, मुलीचे आई-वडील, सासू-सासरे आणि मामा अशा सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे बालविवाह हा केवळ घरगुती विषय नसून तो एक गंभीर फौजदारी गुन्हा आहे,असा कठोर संदेश प्रशासनाने दिला आहे.

घारगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात व त्यांचे पथकाने योग्य तपास करत बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles