अहिल्यानगर-लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर (वय 17) वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर, तरूणाने लग्नास नकार देत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून तरूणावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास अनिल जंगम (रा. जंगम वस्ती, कायनेटीक चौक, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.पीडित मुलीची विकास जंगम सोबत ओळख झाल्याने त्यांच्यात बोलणे वाढवले. यातूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सुमारे एक वर्षापूर्वी, विकासने पीडितेला मी तुझ्यासोबत लग्न करील, असे आश्वासन दिले व पीडितेसोबत शरीरसंबंधाची मागणी केली. पीडितेने सुरूवातीला नकार दिला असता, मी लग्न करणारच आहे, असे सांगून त्याने पीडितेच्या इच्छेविरूध्द बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. यानंतर, विकासने तिच्यासोबत वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले.
या सततच्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. तिने ही गोष्ट विकासला सांगितली असता, त्याने तिला 13 ऑक्टोबर रोजी माळीवाड्यातील एका रूग्णालयात तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी पीडिता गर्भवती असल्याची खात्री केल्यानंतर, विकासने आपले खरे स्वरूप दाखवले. मी तुझा खर्च करतो, पण माझे नाव कोणाला सांगू नको, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी त्याने पीडितेला दिली.
घाबरलेल्या पीडितेने काही दिवस हा प्रकार लपवून ठेवला, परंतु अखेर तिने घडलेली सर्व हकीकत तिच्या आईला सांगितली. पीडितेच्या आई-वडिलांनी विकासकडे जाऊन जाब विचारला आणि मुलीशी लग्न करण्याची मागणी केली, असता त्याने लग्नास ठाम नकार दिला. अखेर, पीडित मुलीने कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून विकास जंगम याच्याविरूध्द फिर्याद दाखल केली.


