अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईची घोषणा; २५ सप्टेंबरला महामोर्चा
गोवंशाचे अवशेष आढळल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
कोठला ईदगाह मैदान चौकात दीड तास रस्ता रोको आंदोलन
महापालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर रस्ता रोको आंदोलन मागे
अहिल्यानगर, – नगर – संभाजीनगर महामार्गावरील ईदगाह मैदानासमोर गोवंश हत्या करून टाकण्यात आलेले अवशेष आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेच्या निषेधार्थ आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर सुमारे दीड तास रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे संभाजीनगर–पुणे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आणि मोठी कोंडी झाली.
आंदोलनादरम्यान दोन्ही आमदारांनी, “संबंधित आरोपींना अटक होईपर्यंत आणि अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू राहील”, अशी ठाम भूमिका घेतल्याने प्रशासनात चांगलीच धावपळ उडाली.
यानंतर महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी “उद्या सकाळपासून अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई सुरू होईल” असे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी रस्ता रोको मागे घेतला.
तथापि, या घटनेच्या तीव्र निषेधार्थ २५ सप्टेंबर रोजी भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. आंदोलनाची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, प्रताप दराडे यांनी फौजफाट्यासह धाव घेतली. काही वेळाने मनपा आयुक्त डांगे आंदोलनस्थळी दाखल झाले. मनपा व पोलीस प्रशासनाच्यावतीने कत्तलखान्यावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी वाहतुक सुरळीत केली.


