सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी दुपारी मुंबईत एका कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी मंडळींशी व्याख्यानाच्या माध्यमातून संवाद साधला. या संवादादरम्यान मोहन भागवत यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवरदेखील भाष्य केलं. यात त्यांनी भाषेवरून वाद घालण्याच्या भूमिकेवर टीका केली. यावरून आता राज ठाकरेंनी मोहन भागवत यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.
मुंबईतल्या कार्यक्रमाला आलेली मंडळी मोदींच्या भीतीपोटी आली होती, असं राज ठाकरे पोस्टमध्ये म्हणाले आहेत. “या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या”, असा टोला राज ठाकरेंनी मोहन भागवत यांना लगावला आहे.
मोहन भागवतांनी मांडलेल्या भूमिकेवर राज ठाकरेंनी या पोस्टच्या माध्यमातून तीव्र शब्दांत टीका केली आहे. “भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे. ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का?” असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
“जेव्हा देशातील ४-५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत?” असंही राज ठाकरे पोस्टमध्ये म्हणतात.
“मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?” असा उल्लेख राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.


