Friday, February 20, 2026

महायुतीचे ६५ उमेदवार बिनविरोध, राज ठाकरेंकडे पुरावे, मनसे कोर्टात जाणार

राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू असतानाच तब्बल ६४ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हे बिनविरोध नगरसेवक जाहीर करण्यात आले. मात्र, आता यावरूनच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याप्रकारचा बिनविरोध पॅटर्न वेळीच थांबवला नाहीतर यापुढे निवडणुकाच होणार नाहीत, अशी भीती मनसेने व्यक्त केली आहे. या बिनविरोध पॅटर्नविरोधात मनसे सोमवारी कोर्टातही जाणार आहे. याबाबतचे सर्व पुरावे मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही सुपूर्त केले आहेत. आज त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.अविनाश जाधव म्हणाले, “काल दिवसभर उमेदवार विकत घेतले जात होते, अर्ज मागे घेण्यासाठी सांगितलं जात होतं. सायंकाळी आम्ही याविरोधात आंदोलन केलं. यामुळे आज सकाळी निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे की या जागा बिनविरोध कशा झाल्या? या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे. ज्यांनी अर्ज मागे घेतले आहेत, ते सर्व विकले गेले आहेत. त्यांच्या मोबाईलचा डेटा चेक केला पाहिजे. कोणी कॉल केले, कितीवेळ कॉल केले? मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले पाहिजे की यांना मतदान केंद्रावर कोण घेऊन गेलं? सगळी निवडणूक पैशांनी विकत घेतली आहे. याच ठिकाणी पैशांचा मोठा व्यवहार झाला आहे. निष्पाप चौकशी झाली पाहिजे. सोमवारी आम्ही याविरोधात कोर्टात जाणार आहोत.”

“कोपरी भागातील मनसेच्या महिला उमेदवाराला पमनानी नावाच्या व्यक्तीने मध्यरात्री जवळपास ३० ते ४० वेळा फोन केले. त्यांना मुलुंड येथे जबरदस्ती भेटायला बोलावलं होतं. उमेदवारी मागे घेण्याकरता त्यांना पाच कोटीची ऑफरही देऊ केले. हवं तर तिथलं सीसीटीव्ही फुटेज चेक करा”, असंही अविनाश जाधव म्हणाले.“राज्यात बिनविरोध पॅटर्न तयार झाला आहे. हा पॅटर्न आता मोडला नाही तर निवडणुकीच्या सहा महिने आधी माणसं दुसऱ्या पक्षात पाठवतील आणि निवडणुकाच होऊ देणार नाहीत. याची चौकशी झाली तर ६४ च्या ६४ ठिकाणी पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. निवडणुकीचा अधिकार प्रत्येकाला आहे. निवडणुकाच होणार नसतील तर मतदान करण्याचा अधिकार मिळणार नाही”, असंही अविनाश जाधव म्हणाले.

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण, डोंबिवली, ठाण्यातील परिस्थिती समजून घेतली. आम्ही राज ठाकरेंना काही पुरावे दिले आहेत. भविष्यात या सर्व गोष्टी समोर येतील. अशी निवडणूक मी कधीही पाहिली नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत. भाजपा आणि शिवसेना या पातळीवर उरले आहेत. आज महानगरपालिकेला झालं, उद्या आमदारकी-खासदारकीला होईल. त्यामुळे आम्ही याविरोधात सोमवारी कोर्टात जाणार आहोत”, असं अविनाश जाधव म्हणाले.

“सरसकट ६४ ठिकाणी बिनविरोध निवड कशी झाली आहे हे तपासायला हवं. सगळे विकले गेलेली माणसं आहे. त्या त्या पालिकांचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त हेच निवडणूक अधिकाऱ्यांचं काम करत आहेत. ही रोज मंत्री महोदयांच्या घरी भांडी घासणारी लोक आम्हाला काय न्याय मिळवून देणार?” असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles