Sunday, December 14, 2025

मान्सूनचा प्रवास आजपासून रखडणार! हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण…

नागपूर : भारतात मान्सूनचा अर्थात मोसमी पावसाचा प्रवास यावर्षी वेगाने सुरू झाला. वेळेआधीच म्हणजे २५ मे रोजी तो दक्षिण कोकणात, तर २६ मे रोजी मुंबईत दाखल झाला. मात्र, २७ मे पासून मोसमी पावसाच्या प्रवासाची गती कमी होणार आहे. पश्चिम रशियावर तयार होणाऱ्या जास्त दाबाच्या पट्ट्याचा परिणाम यावेळी पहिल्यांदाच भारताच्या मोसमी पावसावर होईल, असे मत इंग्लंड येथे कार्यरत हवामान तज्ज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी व्यक्त केले.

त्यांच्या अंदाजानुसार, २७ मे पासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढही होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. किमान पाच जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. यामुळे पाच जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मोसमी पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मोसमी पावसाचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. यावर्षी राज्यातील अनेक भागात वादळी पाऊस पडला. त्यामुळे मोसमी पाऊस लवकरच दाखल होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे. येत्या ३६ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागात पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. दरम्यान, एका बाजूला पाऊस पडत असताना दुसऱ्या बाजूला काही भागात शेती पिकांना देखील फटका बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

२७ मे च्या सुमारास पश्चिम रशियावर एक जास्त दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विदेशातील हवामान बदलाचा परिणाम भारतावर होणार आहे. रशियावर निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा भारतातील आणि विशेषकरून महाराष्ट्रातील मोसमी पावसावर नकारात्मक परिणाम करेल. तो वाऱ्यांच्या दिशेत मोठे बदल घडवून आणणार आहे. ज्यामुळे २७ मे नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तानसारख्या देशाकडून मोठ्या प्रमाणात कोरडी हवा अरबी समुद्राकडे आणि भारताकडे येणार आहे. ही कोरडी हवा महाराष्ट्रासह भारतातील इतर भागात पसरेल. ज्यामुळे मोसमी पावसाचा पुढचा प्रवास किमान पाच जूनपर्यंत रखडणार आहे, असे नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक सायन्स अँड डिपार्टमेंट ऑफ मेट्रिओऑलॉजी, रीडिंग युनिव्हर्सिटी, यूकेचे संशोधन शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles