अहिल्यानगर : राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना दिलेले ‘पॅकेज’ म्हणजे कर्जमाफीच्या रकमेपेक्षा जास्त मदतीचा आधार आहे, असा दावा आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केला आहे.राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना जाहीर केलेल्या ‘पॅकेज’ची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार कर्डिले व जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी हा दावा केला. या वेळी पक्षाचे पदाधिकारी विश्वनाथ कोरडे, चंद्रशेखर खरमरे, युवराज पोटे, विवेक नाईक, सचिन कुसळकर, प्रशांत गहिले, धनंजय बडे, गणेश पालवे, आप्पासाहेब शिरसाट, अर्चना पालवे, गया माने आदी उपस्थित होते.
आमदार कर्डिले यांनी सांगितले, की कर्जमाफीचा लाभ केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांना झाला असता, मात्र अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना शेतीपिकाचे, घराच्या पडझडीचे, मृत व्यक्तीचे, पशुधनाच्या मृत्यूचे, शेती खरवडून गेल्याची रक्कम राज्य सरकारकडून तर मिळणार आहेच; याशिवाय पीक विम्याची रक्कम, पेरणीसाठी बियाणे, रोहयो अंतर्गत प्रतिहेक्टरी मदत अशा विविध मार्गांनी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त भरपाई मिळणार आहे. मदतीसाठी दुष्काळाचे सर्व नियम लागू करण्यात आले आहेत. नियमात न बसणाऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधी, सीएसआर निधीच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे.
विरोधी पक्ष जरी ५० हजार रुपये प्रतिहेक्टरची मागणी करत असले, तरी त्यापेक्षा अधिक मदत राज्य सरकारने दिली आहे. केंद्र सरकारकडूनही मदत मिळणार आहे, याकडे आमदार कर्डिले यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निकषाबाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत करत असल्याचे दिलीप भालसिंग यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीस तीन महिने स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग झाल्यानंतर जिल्हा बँक त्यातून कोणताही हप्ता कपात करणार नाही, याची ग्वाही बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती. मात्र, आता महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ३१ हजार ५६८ कोटी हजार रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. ठाकरे सरकारपेक्षाही मदत अधिक असल्याकडे दिलीप भालसिंग यांनी लक्ष वेधले.


