अहिल्यानगर-जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्यांसाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली काल, बुधवारी पोलीस मुख्यालयात भव्य बदली दरबार आयोजित करण्यात आला. सुमारे 400 पेक्षा अधिक अंमलदारांच्या बदल्यांची ही प्रक्रिया दुपारनंतर सुरू झाली आणि रात्री उशिरापर्यंत चालू होती.
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई व चालकांपर्यंतच्या विविध पदांवरील अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये श्रेणी पोलीस उपनिरीक्षक 11, सहायक फौजदार 43, पोलीस हवालदार 98, पोलीस नाईक 25, पोलीस शिपाई 194 आणि पोलीस चालक 37 अशा विविध पदांवरील अंमलदारांचा समावेश होता. बदलीसाठी पात्र अंमलदारांकडून पूर्वीच अर्ज मागवण्यात आले होते. त्यामध्ये प्रत्येक अंमलदाराला बदलीसाठी तीन पसंती ठिकाणे नमूद करण्याची संधी देण्यात आली होती. बुधवारी दरबारात या पसंतीचा विचार करून अनेक अंमलदारांना समाधानकारक बदली देण्यात आली.
काही अंमलदारांनी आपल्या पसंतीनुसार ठिकाण मिळाल्याने समाधान व्यक्त केले, तर काहींनी पसंतीचा विचार न झाल्याने नाराजी व्यक्त केली. पोलीस अधीक्षक घार्गे यांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण बदल्यांची प्रक्रिया राबवली असून ती पारदर्शक आणि व्यवस्थित पार पडली.
बदल्यांमुळे अनेक अंमलदारांना त्यांच्या पसंतीची ठिकाणे मिळाली असली तरी काहींचा हिरमोडही झाला. विशेषतः एलसीबीच्या इच्छुकांसाठी हे यंदाचे वर्षसुध्दा अपेक्षाभंगाचे ठरले आहे. बदली दरबारात पोलीस अधीक्षक घार्गे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) वैभव कुलबर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश उगले आदी अधिकारी उपस्थित होते.


