जामखेड तालुक्यात चिमुकल्यासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या;
सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्या
खर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल . दोन जण अटकेत
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड – जामखेड तालुक्यातील नायगाव येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावरून २५ वर्षीय तरुणीने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली नाना उगले (वय २५) हिचा विवाह सुमारे आठ वर्षांपूर्वी जामखेड तालुक्यातील नायगाव येथे झाला होता. विवाहानंतर दीड वर्ष सुखाने संसार झाल्यानंतर पती नाना प्रकाश उगले आणि सासरे प्रकाश पंढरीनाथ उगले यांनी तिला माहेरी येऊ न देता वारंवार पैशांची मागणी करून त्रास देण्यास सुरुवात केली.
तक्रारदार शिवाजी श्रीरंग सकुंडे रा. राळेसांगवी पोस्ट पाटसांगवी ता.भूम जि.धाराशिव असलेल्या रूपालीच्या वडिलांनी सांगितले की, याआधी २ लाख रुपये जावयाच्या मागणीनुसार दिले होते; मात्र गेल्या दोन वर्षांत आणखी ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली.दरम्यान, ननंद मनिषा शिवाजी टाळके आणि नंदावा शिवाजी गोरख टाळके यांनीही संसारात ढवळाढवळ करून रूपालीला पतीचे दुसरे लग्न लावून देण्याची धमकी वारंवार दिल्याचे सांगितले जाते.या सततच्या छळाला कंटाळून, दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी सुमारे सायं. ५.३० च्या सुमारास रूपालीने मुलगा समर्थ उगले (वय ६) आणि मुलगी साक्षी उगले(वय ४) यांच्यासह घराजवळील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.
खर्डा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पती , सासरे , ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाचा गुन्हा दाखल असून नामे १) नाना प्रकाश उगले 2 ) प्रकाश पंढरीनाथ उगले 3 ) मनिषा शिवाजी टाळके ४ ) शिवाजी गोरख टाळके
पती नाना उगले व सासरा प्रकाश उगले यांना पोलीसांनी अटक केली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहय्यक पोलीस निरिक्षक उज्वलसिंह राजपुत करत आहेत.
चौकट
दोन लहान मुलांसह आईची आत्महत्या : तालुक्यात हळहळ
काल संध्याकाळी रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्याला जामखेड तालुक्यातील नायगांव येथे एक धक्कादायक घटना घडली . रुपाली नाना उगले या तरुण आईने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली . हि घटना जामखेड तालुक्यात वाऱ्यासारखी पसरताचं तालुक्यात सर्वत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे .